नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रामटेक येथील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अतुल विश्वनाथ हटवार (२५) हा जामिनासाठी पात्र नाही, असे निरीक्षण नोंदवून हटवारचे संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
हटवार रामटेक तालुक्यातील दुधाळा कवडक येथील रहिवासी आहे. ३ जानेवारी २०२१ रोजी नोंदविण्यात आलेल्या पोलीस तक्रारीनुसार, ही घटना २९ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. त्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. आरोपीने पीडित मुलीला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून खिंडसी जंगलात नेले. मुलगी सतत रडत होती, पण तिच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. जंगलात पोहोचल्यानंतर आरोपीने त्याचे साथीदार धीरज जयराम मेहरकुळे, सौरभ दिलीप मेहरकुळे, हर्षल राजू मेहरकुळे व होमदास ताराचंद मेहकुळे यांना जंगलात बोलावून घेतले. ते जंगलात पोहोचल्यानंतर सौरभ वगळता इतरांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सौरभने अन्य प्रकारची लैंगिक कृती केली. त्यानंतर आरोपींनी मुलीला गावात आणून सोडले.
हटवारने सुरुवातीला विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून जामीन मागितला होता. १० जून २०२१ रोजी तो अर्ज खारीज करण्यात आला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता त्याला दणका दिला.
------------------
सहआरोपींना नोटीस
सहआरोपींना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, सर्व सहआरोपींना त्यांचा जामीन का रद्द केला जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली व यावर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
--------------------
विलंबाचा फायदा देण्यास नकार
पीडित मुलीने या गुन्ह्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास विलंब केला. हटवारने जामिनासाठी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, उच्च न्यायालयाने त्याला या आधारावर जामीन दिला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.