लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सकल जैन समाजातर्फे नागपूर येथे होत असलेल्या विकासकामांसाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य व सकारात्मक मदत करील, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी येथे त्यांना भेटलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
ओबीसी वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गृहनिर्माण, तसेच ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे बुधवारी नागपूर दाैऱ्यावर होते. यावेळी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या नेतृत्वात सकल जैन समाजाच्या मोठ्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. उज्ज्वल पगारिया, राजन ढड्डा, अतुल कोटेचा, निखिल कुसुमगर, अनिल पारख, मनीष मेहता, संतोष पेंढारी, नरेश पाटणी, नितीन खारा, दिलीप रांका, आदींचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळात महिला मोठ्या संख्येने सामील होत्या.
जैन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यांसाठी सकल जैन समाजाने नागपूर येथे जमीन घेतली असून, त्या जागेवर अल्पसंख्याक जैन समाजासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याची व विविध परवानग्यांची आवश्यकता असल्याने सरकारने मदत करावी. यांपैकी १५ टक्के जागेचा व्यावसायिक उपयोग करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे या शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्र्यांकडे केली. सकल जैन समाजाच्या मागणीविषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे. तेव्हा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशा शब्दांत अतुल सावे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
फडणवीस यांचेही सहकार्याचे आश्वासन
या संदर्भात अधिक माहिती देताना सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. विजय दर्डा यांनी सांगितले की, समाजाच्या या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्वतंत्र शिष्टमंडळाने भेट घेतली असून, त्यांनीही या जागेचा व्यावसायिक वापर तसेच अन्य मागण्यांबाबत सहकार्याचे आश्वासन दिले आहे.