लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये अरुणा खंडागळे व इतर नऊ गुंतवणूकदारांचा समावेश आहे.या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. मंचलवार व त्याच्या पत्नीने गुंतवणूकदारांकडून २ टक्के व्याजाने पैसे घेतले होते. सुरुवातीला त्याने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत केले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार त्याच्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर त्याने ४९२ गुंतवणूकदारांचे १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपये परत केले नाही. मंचलवार फरार असून, पोलिसांनी केवळ त्याच्या बायकोविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने एमपीआयडी कायद्यांतर्गत मंचलवारची काही मालमत्ता जप्त केली आहे; पण त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करण्यासाठी काहीच प्रयत्न सुरू नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.
नागपूरच्या ठगबाज मंचलवारच्या मालमत्तेचा लिलाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 8:44 PM
४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये अरुणा खंडागळे व इतर नऊ गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
ठळक मुद्देगुंतवणूकदारांची याचिका : हायकोर्टाने सरकारला मागितले उत्तर