नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्रेन्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत ‘मैत्रीसंबंध’ घडवून आणण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीने औरंगाबादच्या एका अभियंत्याकडून चक्क साडेचार लाख रुपये हडपल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या टोळीच्या गळाला केवळ महानगरातीलच नव्हे तर चांद्या पासून बांद्यापर्यंतचेही आंबटशौकिनही बळी पडले आहे. खुद्द आरोपींकडूनच हे खुलासे झाल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे.प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून नागरिकांना फसविण्याची शक्कल लढवणाºया निशा फ्र्रेन्डशिप क्लबचा म्होरक्या रितेश ऊर्फ भेरूलाल भगवानलाल चामार (बैरवा) तसेच त्याच्या टोळीतील सुवर्णा मिनेश निकम (वय ३३, रा. नेरळ, नवी मुंबई), पल्लवी विनायक पाटील (वय २१, रा. खकली वाडा, जि. ठाणे), शिल्पा समीर सरवटे (वय ५२, रा. डोंबिवली, मुंबई) तसेच निशा सचिन साठे (वय २४, रा. गुंजन चौक, येरवडा पुणे) या पाच आरोपींना सक्करदरा पोलिसांनी रविवारी अटक केली. सध्या ते कस्टडीत असून, पोलीस त्यांच्याकडून त्यांच्या कुकृत्याची जंत्री वाचून घेत आहेत. दोन दिवसांच्या चौकशीत आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानुसार, हायप्रोफाईल महिला, डॉक्टर, इंजिनिअर तसेच तरुणींसोबत मैत्री करून देण्याची, महानगरातील मोठी हॉटेल्स, मसाज पार्लर, स्पामध्ये ‘स्मार्ट महिलांसोबत’ गुप्त भेट घडवून आणण्याची तसेच त्यांच्याशी ‘मैत्रीसंबंध’ जोडून देण्याची बतावणी करताच अनेकजण हुरळून या टोळीच्या इशाऱ्यांवर जीवाचा आटापिटा करीत होते. प्रत्यक्ष भेट नसली तरी केवळ फोनवरून मिळालेल्या सूचनांनुसार जाळ्यात अडकलेली व्यक्ती कठपुतळीसारखी नाचत होती. दोन तासात २० हजार रुपये मोबदला कमविण्याचेही आमिष दाखवले जात असल्याने बेरोजगारच नव्हे तर धनिकबाळ अन् आंबटशौकिनही या टोळीच्या जाळ्यात अडकत होते. औरंगाबादमधील एक अभियंताही असाच या टोळीच्या जाळ्यात सहा महिन्यांपूर्वी अडकला अन् त्याने चक्क ४ लाख, ५० हजार रुपये गमविले. म्हणेल तेव्हा अन् म्हणेल तेवढी रक्कम तो अभियंता या टोळीच्या सदस्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा करीत होता. पैसेच भरत नव्हता तर सांगितले त्या ठिकाणी, जात होता. बँक खात्यातील सर्व रक्कम संपल्यानंतर आपण मूर्ख बनविले जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. या टोळीने राज्यातील हजारो लोकांना गंडा घातला. मात्र, सर्वाधिक रक्कम ज्याच्याकडून मिळाली तो म्हणजे औरंगाबादचा हा अभियंता असल्याची माहिती टोळीने पोलिसांना दिल्याचे समजते. पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदरा पोलीस या टोळीचे कुकृत्य उघड करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
निवृत्तांच्याही उड्याकेवळ आठवी पास असलेला राजस्थानमधील मूळ निवासी रितेश चामार मुंबई, पुणे आणि ठाण्यातून फ्रेन्डशिप क्लब संचालित करीत होता. मात्र, त्याच्या बनवाबनवीचे नेटवर्क राज्यातील सर्वच मोठ्या शहरात पोहचले होते. राज्यातील महानगरातील मंडळीच नव्हे तर गोंदिया, भंडारातील आंबटशौकिनांनीही रितेशच्या फ्रेन्डशिप क्लबची मेंबरशिप घेतली होती. नंतर कुणी ५० तर कुणी ७० हजार आणि काही जणांनी हायप्रोफाईल महिलांशी मैत्री करण्याच्या नादात लाख-दोन लाखांची रक्कमही गमावली होती. रितेश आणि त्याच्या टोळीकडून चालविल्या जात असलेल्या कथित फे्रन्डशिपच्या एकूण सदस्यांपैकी (पीडितांपैकी) सर्वाधिक पीडित पन्नाशी ओलांडलेले आहे. पीडितांमध्ये सेवानिवृत्तीचे जीवन जगणारांची संख्याही लक्षणीय असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्याचे सांगितले जाते.