नागपूर - पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील आरोपींनी उमेदवाराकडून लाखो रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गिट्टीखदान ठाण्यात औरंगाबादच्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस दलात पोलीस भरतीची पात्रता परिक्षा नुकतीच पार पडली. मैदानी चाचण्या तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यातील सजरपूर वाडी, परसोंडा (ता. वैजापूर) येथील जयपाल कारभारी कंकरवाल आणि त्याच्या मित्राने शक्कल शोधली.
आरोपी विशाल लखवाल (रा. रघुनाथपूर, हजारवाडी) आणि त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील साथीदार पोलीस भरतीच्या परिक्षेचे रॅकेट चालवितात. कंकरवाल आणि त्याच्या मित्राने आरोपी विशाल लखवाल आणि साथीदारांना १३ लाख रुपये देऊन त्यांच्याकडून २८ ऑक्टोबर २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या शारिरिक चाचण्या आणि लेखी परिक्षेचा पेपर सोडवून घेतला. विशेष म्हणजे, ऑनलाईन लेखी परिक्षेत तो उत्तीर्णही झाला. शारिरिक तपासणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर विशाल लखवाल ऐवजी जयपालचा फोटो दिसल्याने पोलिसांच्या लक्षात बनवाबनवी आली. त्यानंतर शहर पोलिसांनी गोपनिय चाैकशी सुरू करून बुधवारी या प्रकरणात आरोपी कंकरवाल, लखवाल, मिथून गबरूसिंग बमनावत (रा. सजरपूर) आणि तेजस जाधव (रा. शिवुरता, वैजापूर) या चाैघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यातील कंकरवालसह दोघांना अटक करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.
ए टू झेड पॅकेज
या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, आरोपी पोलीस भरतीत हमखास पास करून देण्याची हमी देत होते आणि ए टू झेड पॅकेज घेत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सामजते. दरम्यान, या टोळीत आणखी काही जण सहभागी असावे आणि त्यांनी अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातला असावा, असा संशय आहे.
पोलीस बनण्यासाठी केला गंभीर गुन्हा, तपास गुन्हे शाखेकडे
वेगवेगळे गुन्हे शोधून काढण्याची आणि गुन्हेगारी नियंत्रीत करण्याची जबाबदारी पोलीस सांभाळतात. अनेक जणांना ते गुन्हे करण्यापासूनही परावृत्त करतात. जयपालला पोलीस बनायचे होते. मात्र, त्यासाठी त्याने भलताच मार्ग निवडला अन् आरोपींच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
----