प्रवीण खापरे
नागपूर : भारतीय संस्कृतीत व ज्योतिष गणनेमध्ये अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी अक्षय म्हणजेच कधीही क्षय होणार नाही असा हा मुहूर्त मानला जातो. अशा या मुहूर्तालाच गेल्या पन्नास वर्षांनंतर सुरेख अशी संधी जुळून आली आहे. एकसाथ तीन-तीन राजयोग अक्षय तृतीयेला येत असून, ते प्राणिमात्रात अक्षय लाभ मिळवून देणार असल्याचे आर्यभट्ट ॲस्ट्रोनॉमी पार्कचे ज्योतिषाचार्य डॉ. भूपेश गाडगे यांनी सांगितले.
यंदा मंगळवारी आलेली अक्षय तृतीया अनेक कारणांनी महत्त्वाची ठरणार आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ही तिथी येत असते. ज्योतिष गणनेनुसार या तिथीला तीन महत्त्वाचे राजयोग जुळून येत आहेत. ज्या वेळेस अक्षय तृतीया मंगळवारी येते आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र येत असेल तर त्या तिथीला दुर्लभ मंगलरोहिणी योग म्हटले जाते. यंदाच्या अक्षय तृतीयेला हा योग येत आहे. यासोबत अतिशय उत्तम मानला जात असलेला सोहन योगही येत आहे. याच वेळेस गुरू हा स्व राशीमध्ये हंसराज योग बनवतो आहे. याच दरम्यान शुक्र उचीच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीला असल्यामुळे मानव्ययोग, तर शनी हा कुंभ राशीला असल्यामुळे शशी योग तयार करतो आहे. हे तीनही योग स्व राशीचे व उचीचे योग असल्यामुळे सर्वोत्तम मानले गेले आहेत.
चंद्र आणि सूर्यही स्व राशीत
राजयोगांसोबतच ज्योतिष गणनेतील महत्त्वाचे असे चंद्र व सूर्य हे सुद्धा उचीच्या स्व राशीत येत आहेत. चंद्र आपल्या उचीच्या स्व राशीमध्ये अर्थात वृषभ राशीत, तर सूर्य आपल्या उचीच्या राशीत असणार आहे. हे सगळे दुर्लभ तसेच शुभ योग आहेत.
अबूज मुहूर्त, सर्वाधिक शुभ संयोग
अक्षय तृतीयेला अबूज मुहूर्त म्हटले जाते. विवाह, मुंडन, मुंज, गृहप्रवेश, मांगलिक कार्य, वाहन खरेदी, सोने खरेदी, कोणतेही कार्य आदींसाठी हा शुभयोग मानला गेला आहे. या दिवशी कोणतेही कार्य सुरू केल्यानंतर ते अक्षत राहतात. उत्तम प्रकारचे फळ देणारे असतात. यावेळी भगवान विष्णू व माँ सरस्वतीची पूजा केली जाते. शिवाय वरील सारे अतिशय शुभ योग आहेत. बृहस्पती आणि शनी, आदी हे महत्त्वाचे ग्रह असतात. शनिदेवता आणि बृहस्पती हे ग्रह स्व राशीचे असले तर चांगले मानले गेले आहेत.
- डॉ. भूपेश गाडगे, ज्योतिषाचार्य