शांतिवन चिचोली : आॅस हेरिटेजचे विनोद डॅनियल यांनी दिली भेट नागपूर : शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक वस्तू चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी आॅस्ट्रेलिया सरकारने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आॅस्ट्रेलियातील आॅस हेरिटेजचे चेअरमन विनोद डॅनियल यांनी आज सोमवारी शांतिवन चिचोलीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शांतिवन चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वस्तू संग्रहालय आहे. या संग्रहालयात तब्बल ४०० वर बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वस्तू आहेत. त्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या कपड्यांपासून तर विविध वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंना वाळवी लागल्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या वस्तू टिकवून ठेवण्यासाठी शांतिवन चिचोलीचा कारभार पाहत असलेल्या भारतीय बौद्ध परिषदेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. लोकवर्गणीसुद्धा गोळा केली जात आहे. या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबासाहेबांच्या या वस्तूंच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा प्रसार माध्यमांनीसुद्धा उपस्थित केला होता. त्याद्वारे देश-विदेशातील बौद्ध-आंबेडकरी बांधवांपर्यंतही याची माहिती पोहोचली. त्यातून बाबासाहेबांच्या या वस्तू ऐतिहासिक असल्याने त्या हजारो वर्षे टिकवून ठेवण्याचा मुद्दा पुढे आला. भारतीय बौद्ध परिषदेचे संजय पाटील यांनी आॅस हेरिटेजचे विनोद डॅनियल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी होकार दिला. विनोद डॅनियल हे कन्झर्व्हेशन क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ मानले जातात. ते सध्या आॅस्ट्रेलिया सरकारच्या आॅस हेरिटेज बोर्डाचे चेअरमन आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कौन्सिल आॅफ म्युझियम-कमिटी फॉर कन्झर्व्हेशनचे व्हाईस चेअरमन आहेत. याशिवाय आॅस्ट्रेलिया सरकारच्या संस्कृती व हेरिटेजशी संबंधित विविध विभागांमध्ये ते कार्यरत आहेत. भारतातील अनेक संग्रहालयातील वस्तूंच्या कन्झर्व्हेशनचे काम त्यांनी केले आहे. विनोद डॅनियल यांनी रविवारी नागपूर येथून शांतिवन चिचोलीला भेट दिली. येथील डॉ. आंबेडकर वस्तू सग्रहालयातील प्रत्येक वस्तूंची त्यांनी सूक्ष्मपणे पाहणी केली. इमारतीची पाहणी केली. भारतीय बौद्ध परिषदेचे संजय पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. काही टिपण घेतले. त्यामुळे आता बाबासाहेबांच्या वस्तू चिरकाल टिकून राहण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)जानेवारीत येणार तज्ज्ञ चमू विनोद डॅनियल यांनी शांतिवन चिचोलीची संपूर्ण पाहणी केली असून, ते रवाना झाले आहेत. जानेवारीमध्ये आॅस हेरिटेजमधील तज्ज्ञांची एक चमू शांतिवन चिचोलीत येईल. ते सूक्ष्म पाहणी करून रिपोर्ट सादर करतील. त्या रिपोर्टनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
बाबासाहेबांच्या वस्तूंच्या जतनासाठी आॅस्ट्रेलियाचा पुढाकार
By admin | Published: November 11, 2014 1:01 AM