लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आऊटर रिंग रोडवर दिवसाढवळ्या एका ऑटो चालकाचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. गेल्या ४८ तासातील खुनाची ही तिसरी घटना आहे. या घटनांमुळे पोलीसही हादरले आहेत. अनिल बर्वेकर (३१, रा. खरबी) असे मृताचे नाव आहे.
अनिल ऑटोचालक आहे. दुपारी १ वाजता पोलिसांना आऊटर रिंग रोडवर अनिलचा मृतदेह आढळून आला. दगडाने डोके ठेचून त्याचा खून करण्यात आला आहे. मृतदेहाजवळच दगडही पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. डीसीपी डॉ. अक्षय शिंदे हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. ऑटोच्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी लगेच अनिलची ओळख पटविली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली. परंतु त्याचा कुणाशी वाद असल्याचे कुणीही सांगितले नाही.
दिवसाढवळ्या झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांना संशय आहे की, आरोपी हे अनिलसोबतच तिथे आले होते. ते खून करण्याच्या उद्देशानेच आले होते, की त्यांचे अचानक भांडण होऊन हा खून झाला, हे मात्र समजू शकलेले नाही. पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. त्या आधारावर तपास केला जात आहे.
बॉक्स
युवकावर जीवघेणा हल्ला
जुन्या वैमनस्यातून अजनीत एका युवकावर हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी न्यू कैलाशनगर येथे घडली. अक्षय ऊर्फ गोलू रामदास वानखेडे (२५, रा. न्यू कैलासनगर) असे जखमीचे नाव आहे, तर पंकज दिग्रसे (२५) आणि अंकुश मारुती कावरे (२६, रा. वसंतनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी आरोपींचा गोलूसोबत वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी बुधवारी सायंकाळी गोलूवर हल्ला केला. चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अजनी पोलिसांनी दाखल केला आहे.