लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीला (वय १७) आरोपी आॅटोचालकाने मोबाईल घेऊन देतो, असे सांगून इसासनीच्या जंगलात नेले. तेथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पीडित मुलगी बेवारस अवस्थेत रेल्वेस्थानकावर फिरताना आढळल्याने पोलिसांनी तिला शासकीय सुधारगृहात पाठविले. मुलीने तेथील वॉर्डनला ही माहिती दिल्यानंतर बलात्काराचा हा गुन्हा दोन आठवड्यानंतर उजेडात आला.मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरची रहिवासी असलेली पीडित मुलगी गतिमंद आहे. दोन महिन्यांपूर्वी ती तिच्या आईसोबत इसासनीच्या नातेवाईकांकडे आली होती. तेथे ती राहिल्यानंतर मायलेकी गावाला परत गेल्या. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यांपूर्वी ती मुलगी एकटीच नागपुरात आली. इसासनीला जाण्यासाठी आॅटो शोधत असताना सीताबर्डीत आरोपी आॅटोचालक रोहित उकेच्या नजरेत ती पडली. त्याने तिला आपल्या आॅटोत बसविले. मुलीने मोबाईल घ्यायचा आहे, असे म्हटल्याने त्याने तिला मोबाईल घेऊन देतो, अशी थाप मारून इसासनीच्या जंगलात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एमआयडीसीत सोडून पळून गेला. मुलीला तिच्या नातेवाईकाचे घर दिसले नाही. त्यामुळे ती परत रेल्वेस्थानकावर आली. बेवारस अवस्थेत फिरताना आढळल्याने तिला सीताबर्डी पोलिसांनी चौकशी केली. ती नाव, गाव, पत्ता नीट माहिती सांगत नसल्याने तिला शासकीय सुधारगृहात दाखल केले.चार दिवसांपूर्वी तेथे दाखल असलेल्या काही मुलींना तिने इसासनीतील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती दिली. मुलींनी वॉर्डनला तर वॉर्डनने सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिचे मेडिकल करवून घेतले. तिला विचारपूस केली असता तिने नक्की तारीख आठवत नसल्याचे आणि आरोपीचे नाव रोहित उके असल्याचे सांगून बाकी काही माहीत नसल्याचे सांगितले. नागपुरात येण्यापूर्वी गावातही एकाने बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार दोन गुन्हे दाखल केले. पहिल्या गुन्ह्याची नोंद करून तो मध्य प्रदेश पोलिसांना तपासासाठी पाठविला. दुसरा गुन्हा आॅटोचालक उकेविरुद्ध दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.पोलीस संभ्रमात !हे प्रकरण प्रारंभी एमआयडीसी पोलिसांकडे गेले होते. घटनाक्रम सीताबर्डीतून सुरू झाल्याने ते तपासासाठी सीताबर्डी पोलिसांकडे आले. दरम्यान, या प्रकरणात बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असला तरी पोलीस संभ्रमात आहेत. कारण तिच्या नातेवाईकांना विचारणा केली असता ही मुलगी गतिमंद असल्यामुळे ती कुणाचेही नाव घेते, असे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. दोन ते तीन आठवड्यांपूर्वी (१० ते १५ आॅक्टोबर) दरम्यान गुन्हा घडल्याचे ती सांगते. तत्पूर्वीच तिला पोलिसांनी सुधारगृहात पाठविल्याने हे प्रकरण पोलिसांना संभ्रमात टाकणारे ठरले आहे. दरम्यान, पोलिसांनी रोहित उके नावाच्या आॅटोचालकाचा शोध चालविला आहे.अल्पवयीन शाळकरी मुलावर अत्याचारसदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शाळकरी मुलाला (वय ११) आपल्या घरी नेऊन एका अल्पवयीन आरोपीने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. रविवारी रात्री ७ ते ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.पीडित मुलगा रात्रीच्या वेळी परिसरात फिरताना दिसल्याने आरोपी मुलाने त्याला आपल्या घरी नेले आणि तेथे त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याला हाकलून दिले. पीडित मुलाने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.