प्रदूषणमुक्त इंधन : नागपुरात आॅटो एलपीजी २९.८९ रुपयांनी स्वस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोलच्या दररोज बदलत्या किमतीवर आॅटो एलपीजी म्हणून पर्याय पुढे आला आहे. या इंधनावर धावणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या गाड्यांच्या खरेदीला नागरिक प्राधान्य देत आहेत. याशिवाय नव्याने बाजारात येणाऱ्या सर्व तीनचाकी एलपीजी इंधनावर आहेत. नागपुरात पेट्रोलच्या तुलनेत आॅटो एलपीजीची किंमत ४० टक्के स्वस्त आहे. नागपुरात १० नवीन पंप सुरू होणार नागपुरात पेट्रोल ७४.०४ रुपये आणि आॅटो एलपीजीचे दर ४४.१५ रुपये आहेत. एलपीजी इंधन २९.८९ रुपयांनी अर्थात ४० टक्क्यांनी स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असून वाहनचालकाला परवडणारे आहे. सध्या नागपुरात आॅटो एलपीजीचे चार पंप असून कॉन्फिडन्स पेट्रोलियमचे ‘गो गॅस’ नावाने १० नवीन पंप चालू आर्थिक वर्षांत नागपुरात सुरू करणार आहे. त्यामुळे या कंपनीचे नागपुरात ११ पंप कार्यरत राहणार आहे. आॅटो एलपीजी इंधन शहरात सर्वत्र उपलब्ध राहिल्यास या इंधनावर धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होणार आहे. सध्या चार पंपावर दररोज जवळपास चार हजार लिटर एलपीजीची विक्री आहे. पंपांच्या वाढत्या संख्येनुसार विक्री पाचपटीने वाढण्याची शक्यता आहे. आॅटो एलपीजी ५३.१६ टक्क्यांपर्यंत स्वस्त देशातील काही प्रमुख शहरांपैकी कोईम्बतूर येथे पेट्रोल आणि आॅटो एलपीजी इंधनाच्या ५ जुलैच्या तुलनात्मक किमती पाहिल्यास एलपीजी इंधन ५३.१६ टक्के स्वस्त आहे. जयपूर येथे पेट्रोलचे दर ६५.७७ रुपये तर आॅटो एलपीजीची किंमत ३३.३ रुपये आहे. दोन्ही इंधनाच्या दरात ३२.७४ रुपये अर्थात ४९.७७ टक्के फरक आहे. नाशिकमध्ये पेट्रोल ७३.७५ रुपये आणि आॅटो एलपीजी ३५.९५ रुपये लिटर असून दोन्ही इंधनाच्या किमतीत ३७.०८ रुपयांचा फरक आहे. नाशिकमध्ये आॅटो एलपीजी इंधन ५१.२५ टक्के स्वस्त आहे. चेन्नईमध्ये आॅटो एलपीजी ३२.७४ रुपयांनी स्वस्त, हैदराबादमध्ये ३३.५८ रुपये, बेंगळुरूमध्ये ३०.३३ रुपये, मंगलोर येथे ३२.७० रुपये, कोलकातामध्ये ३४.०७ रुपये आणि मदुराई येथे आॅटो एलपीजी इंधन ३४.४७ रुपयांनी स्वस्त आहे. नागपुरात आॅटो एलपीजीचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास नागपूर प्रदूषणमुक्त शहर म्हणून पुढे येणार आहे.
पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर आॅटो एलपीजी पर्याय
By admin | Published: July 06, 2017 2:30 AM