लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानक परिसरात आपल्या पतीसह काम करून रेल्वेस्थानकावरच मुक्काम करणाऱ्या लक्ष्मी आणि तिच्या पतीला रेल्वेस्थानकावरील आॅटोचालक, कुली सर्वच जण ओळखत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करून उपचाराचा खर्च आॅटोचालकांनी उचलला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतरही आॅटोचालकांनी तिचे प्रेत तिच्या मूळगावी नेण्यासाठी पैसे गोळा करून आपल्यातील माणुसकीचा परिचय दिला आहे.लक्ष्मी (४५) रा. सिवनी असे त्या महिलेचे नाव आहे. २० वर्षांपूर्वी लक्ष्मी आणि तिचा पती कामाच्या शोधात रेल्वे स्थानकावर आले. त्यांना काम मिळाल्याने ते येथेच स्थायिक झाले. रेल्वेस्थानकावरच राहत असल्यामुळे त्यांची आॅटोचालकांशी चांगलीच ओळख झाली होती. लक्ष्मीला सांगितलेले काम ती प्रामाणिकपणे करायची. त्यामुळे अनेकांच्या मनात तिच्याविषयी आदर होता. ती आजारी असल्याचे रेल्वेस्थानकावरील आॅटोचालकांना समजले. लगेच रेल्वे स्टेशन कुली, आॅटो चालक, टॅक्सी चालक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव अल्ताफ अन्सारी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन लक्ष्मीला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचे प्रेत तिच्या मूळगावी नेण्यासाठी तिच्या पतीजवळ पैसे नव्हते. ही बाब आॅटोचालकांना समजली. रेल्वेस्थानकावरील सर्व आॅटोचालक एकत्र आले. त्यांनी पैसे गोळा करून मृतदेह नेण्यासाठी पैसे पुरविले. एवढेच नव्हे तर एक आॅटोचालक सहकारीही मृतदेहासोबत पाठविला. यात कुली संघटनेचे अब्दुल मजीद, आॅटोचालक मो. अलीम अन्सारी, अशफाक खान, अल्ताफ अन्सारी, शकील खान, प्रदीप पाटील, असलम अन्सारी, मुक्तार अहमद, मो. वसीम, अकील अहमद आदींनी पुढाकार घेतला. आॅटोचालकांनी एका गरीब महिलेच्या अखेरच्या प्रसंगी केलेल्या मदतीमुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करणे तिच्या पतीला शक्य झाल्याची भावना रेल्वेस्थानक परिसरात अनेकांनी व्यक्त केली.