लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदा व सुव्यवस्था सांभाळताना सामान्य माणसांची सेवा करणाऱ्या पोलिसांना सामान्य माणसांकडून किती सहकार्य लाभते हा संशोधनाचा विषय. सहकार्य सोडा तर पोलिसांपासून चार हात दूरच राहण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. शहरातील आॅटोचालकांना तर पोलिसांचा कायम तिटकारा असतो. अशा नकारात्मक परिस्थितीत एक आॅटोचालक मात्र उन्हातान्हात सेवा देणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धावतो आहे. दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे.प्रशांतच्या मनात ही पोलीसभक्ती कशी जागली, याची कथा रंजक आणि भावनिकही आहे. प्रशांत मूळचा भंडारा येथे राहणारा. १० वर्षापूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई प्रशांत व त्याच्या दोन लहान भावंडांना घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या बिजापूर येथे आपल्या माहेरी आली. त्यावेळी प्रशांतने नुकतीच बारावी पूर्ण केली होती. भावंडांचा सांभाळ व आईला मदत म्हणून तो रोजगाराच्या शोधात नागपूरला आला.सुरुवातीचे चार वर्षे त्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम केले. त्यानंतर कंपनीतही काम केले. त्यावेळी थोडे थोडे पैसे गोळा करून त्याने एक आॅटो खरेदी केला. यातून त्याची चांगली कमाई होत होती व आर्थिक स्थैर्य आले होते.मात्र एकदा अचानक आलेल्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याने जीवनच संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता आणि तसा प्रयत्नही केला. नेमक्या त्यावेळी प्रशांतला पोलिसातील देवदुताचे दर्शन घडले. धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने यांनी अशा संकटाच्या भावनिक वेळी त्याचे समुपदेशन व मार्गदर्शन करीत त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत केली.माने यांच्यामुळेच आपल्याना दुसरे जीवन मिळाल्याचे तो मानतो. कोणत्याही परिस्थितीचा व संकटाशी सामना करण्याची ताकद मिळाल्याचे तो सांगतो. दरम्यानच्या काळात प्रशांतने दोन आॅटो खरेदी केले व लग्नही केले. आज तो पत्नी, आई व भावंडांचा सक्षमपणे सांभाळ करू शकत आहे. मात्र पीआय माने यांनी केलेल्या मदतीची जाणीव त्याला होती. या मदतीची परतफेड म्हणून त्याने आॅटोच्याच माध्यमातून पोलिसांच्या सेवेचे व्रत स्वीकारले.ड्युटी बजावताना पोलिसांना इकडे तिकडे फिरावे लागते. कधी आरोपीला कोर्टात हजर कर, तर कधी मेडिकलला ने. अशा धावपळीत अनेकदा पोलिसांना अकस्मात प्रसंगांना तोंड द्यावे लागते किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी धावपळ करावी लागते. अशावेळी प्रशांत एका फोनवर संबंधित पोलिसाच्या मदतीला धावून जातो. स्वत:जवळचे दोन्ही आॅटो या कामी लावले आहेत. एवढेच नाही तर मित्रांचे आणखी दोन आॅटो त्याने पोलीस सेवेत लावले आहेत. ‘दुपारी १२ ते ५ पोलिसांच्या सेवेसाठी नि:शुल्क’ असे आवाहन करीत त्याने आपला मोबाईल क्रमांक त्यावर नमूद केला आहे.प्रशांत यांच्या या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत असून मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याच्या कामाचे कौतुक केले. नुकताच पोलीस निरीक्षक हेमंत खराबे व धंतोलीचे पीआय दिनेश शेंडे यांनी प्रशांतचा सत्कारही केला. पोलिसांबद्दलची त्यांची कृतज्ञता पोलीस व सामान्य नागरिकाचे नाते अधिक मजबूत करणारी आणि कर्तव्यदक्ष पोलिसांमधील हळव्या माणुसकीला सलाम करणारी आहे.
नागपुरातील आॅटोचालकाची पोलीसभक्ती; दुपारी देतो नि:शुल्क सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:13 PM
दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे.
ठळक मुद्देपोलिसांमुळे मिळाले दुसरे जीवन