लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अवनी प्रकरण दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांना स्वत:ला अवनीच्या मृत्यूचे दु:ख आहे. परंतु याचाही विचार करायला हवा की, अवनी ही नरभक्षी झाली होती. यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात तिची दहशत होती. जवळपास १३ आदिवासी लोकांना तिने आपले शिकार बनवले होते. तिला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव तिला मारावे लागले. तिला मारले नसते तर तिने आणखी कितीतरी लोकांना आपले शिकार बनवले असते. यात मुनगंटीवार यांचा कुठलाही दोष नाही. परंतु या संदर्भात अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. उद्योगपतीचे नाव घेतले जात आहे. परंतु याचा कुणीही विचार करीत नाही की, ज्या १३ लोकांना अवनीने आपली शिकार बनवले आहे, त्या लोकांच्या कुटुंबीयांची दिवाळी कशी गेली असेल. अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे लोकप्रिय नसतात. याबाबतही असाच निर्णय घेतला गेला, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.आदिवासी नागरिकांच्या हिताचा निर्णयगडकरी म्हणाले, अवनीबाबतचा निर्णय हा आदिवासी, शोषित नागरिकांचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला. परंतु याविरुद्ध विनाकारण वक्तव्य केले जात आहे. गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक करीत सांगितले की, मुनगंटीवार हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कामे करीत आहे. नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून विकसित केले जात आहे. मुनगंटीवार यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात एकाच दिवशी १४ कोटी वृक्षांचे रोपण शक्य होऊ शकले.