लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. परंतु हा आनंद केवळ औट घटकेचा ठरणार आहे. लॉकडाऊननंतर रिडींगप्रमाणे बिलाची वसुली केली जाईल. तेव्हा हेच सरासरी बिल ऐन पावसाळ्यात ग्राहकांना महागात पडेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यानुसार अनेकांना साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील बिलाएवढेच एप्रिल व मे महिन्यातील बिल आले आहे. पण, मोठ्या संख्येने ग्राहक बिलच भरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महावितरणची बिलापोटी होणारी वसुली केवळ ४० टक्केच झाली तर मे महिन्यात वसुली २५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. वसुलीच कमी असल्याने आर्थिक ताळेबंद जुळविण्यासाठी लॉकडाऊननंतर ही वसुली भरून काढण्यात येणार आहे. सर्वाधिक वीज वापर असलेल्या महिन्यातील वीज वापराची रिडींगनुसार वसुली करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रेग्युलर बिलाचा आकडा चांगलाच वाढलेला राहणार आहे. प्रसंगी ग्राहकांचा आक्रोशही सहन करावा लागू शकतो. पावसाळ्यात होणारी ही अडचण लक्षात घेता महावितरणने रिडींग व बिल वाटप सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.