नागपूर : एव्हीएशन हे विशाल क्षेत्र आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने वाढत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.फडणवीस यांच्या हस्ते मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नागपूरच्या वाटचालीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा येथे हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होईल. एमआरओमुळे नागपुरात हेलिकॉप्टरची फार मोठी इकोसिस्टीम तयार झाली आहे. हेलिकॉप्टरचा उपयोग जगामध्ये मोठ्या प्रमाणात मेडिकल सर्विसेस, पर्यटन, कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी होत आहे. एव्हिएशन पॉलिसीमध्ये या सर्व बाबींचा समावेश राहील, असेही फडणवीस म्हणाले.