हायकोर्ट : कठोर कारवाई न करण्याचे आदेशनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. हा एफआयआर रद्द करण्यासाठी भुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांनी बुधवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या कालावधीत भुते यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश दिला. भुते हे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे गुंतवणूकदार असून कंपनीकडून त्यांना गुंतवणुकीचा परतावा म्हणून रक्कम मिळाली आहे. तपास अधिकारी या तथ्याकडे दुर्लक्ष करून भुते यांना याप्रकरणात फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भुते यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. पोलिसांनी वासनकर कंपनीच्या लाभार्थ्यांची यादी मिळविली आहे. त्यावरून भुते यांना अटक करण्यात आली. वासनकरने भुते यांच्या खात्यात ९ कोटी २० लाख रुपये वळते केले होते. पोलिसांना भुते यांच्याकडून व्याजासह १३ कोटी ५० लाख रुपये वसूल करायचे आहेत. भुते यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता व अॅड. आर. के. तिवारी यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
एफआयआर रद्द करण्यासाठी अविनाश भुतेंचा अर्ज
By admin | Published: March 17, 2016 3:28 AM