लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कथितपणे १३ नागरिकांचा बळी घेतल्याची शिक्षा म्हणून पांढरकवड्याच्या ‘अवनी’ वाघिणीला शिकाऱ्याद्वारे मारण्यात आले. अवनी गेली आणि तिचे दाेन्ही शावक पाेरके झाले. त्यातलीच ‘ही’ त्यावेळी केवळ १० महिन्याची हाेती. जगायचे कसे हे कळण्याआधीच आईच्या मायेला मुकलेली ही सुद्धा वाचेल की जाईल, हा प्रश्नच हाेता. धाकटा भाऊ तर बेपत्ताच झाला. अशावेळी अवनीच्या हत्येचा डाग लागलेल्या वनविभागासमाेरही तिच्या मुलीला जगविण्याचे आव्हान हाेते. विभागाने जंगलातीलच बंदिवासात ठेवून लहानाचे माेठे करताना प्रशिक्षितही केले. तेव्हा शावक हाेती, ती मुलगी आता वयात आली. वनविभागानेही संधी पाहून शुक्रवारी तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हाे, पण तिच्या हालचालीवरून वनविभागाच्या प्रयत्नांचे यश अवलंबून राहणार आहे.
लहान व अप्रशिक्षित असताना २२ डिसेंबर २०१८ राेजी या मादी शावकाला पेंचच्या तीतरालमांगी येथील बंदिस्त आवासात आणण्यात आले हाेते. प्रधान मुख्य वनसंरक्षक-वन्यजीव यांच्या समितीमार्फत तिचे निरीक्षण केले जात हाेते. या काळात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक पद्धतीनुसार तिला याेग्य ते प्रशिक्षणही दिले गेले. या वाघिणीला नंतर पीटीआरएफ-८४ असे नाव देण्यात आले. आज तिचे वय ३ वर्षे २ महिने एवढे झाले आहे. प्रशिक्षणाच्या निरीक्षणानंतर समितीने तिला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने तिला पेंच येथेच निसर्गमुक्त करण्यास मान्यता दिल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थेच्या तज्ज्ञांच्या मदतीने तिच्या हालचाली टिपण्यासाठी रेडिओ काॅलर लावण्यात आले. पूर्ण तयारी झाल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी बंदिस्त आवासाचा दरवाजा उघडण्यात आला व तिनेही मुक्त अधिवासाकडे कुच केली.
मुक्त झाल्यानंतर काही महिने जमिनीवरून आणि उपग्रह सिग्नलच्या माध्यमातून तिचे निरीक्षण केले जाणार आहे. वन विभागाने व्यावसायिक आणि शास्राेक्त पद्धतीने पीटीआरएफ-८४ वाघिणीला प्रशिक्षित करण्यात आले आहे. निसर्गमुक्त केल्यावर जंगलात ही वाघीण कसे जुळवून घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ही माहिती भविष्यात व्याघ्र व्यवस्थापनात नक्कीच उपयाेगी पडेल.
- डाॅ. रविकिरण गाेवेकर, प्रकल्प संचालक व मुख्य वनसंरक्षक, पेंच व्याघ्र प्रकल्प.