नागपूरकरांचा लोकोत्सव मारबत उत्सव शुक्रवारी साजरा झाला. रिमझिम पावसात नाचणारी तरुणाई... ढोलताशांचा निनाद... दमदार घोषणा आणि डेंग्यू, खड्डे घेऊन जा ऽऽ गे मारबत, इडापिडा टळो.. असा गजर करीत मारबत मिरवणूक नेहरू चौकात पोहोचली. सरकारचे कान टोचणारे बडगे, बेरोजगारी, पाकिस्तानच्या कुरापती, दहशतवादविरोधी बडग्यांनीही लक्ष वेधले. विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील लोकही या उत्सवासाठी खास नागपुरात आले होते. १४३ वर्षांची परंपरा १८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला. त्यानंतर भोसले घराण्याला वाईट दिवसांना सामोरे जावे लागले म्हणून बकाबाईच्या नावाने काळी मारबत काढण्याची परंपरा सुरू झाली.
उत्सवाचा उद्देशउत्सवातील मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची वाजत-गाजत धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.