डम्पिंग यार्डला पुन्हा आग : धुरामुळे नागरिक त्रस्त, संतप्त नागरिकांचा रास्ता रोकोनागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंगयार्डला सोमवारी सकाळी पुन्हा आग लागली. आगीच्या धुरामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील संतप्त नागरिकांनी सकाळी ८.३० पासून रास्ता रोको केला. डम्पिंगयार्डमध्ये येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या. यामुळे थोड्याच वेळात कचऱ्याच्या शेकडो गाड्यांची रांग लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी अचानक आंदोलन पुकारल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला. चक्काजाम आंदोलनाची नंदनवन पोलिसांना माहिती देण्यात आली. थोड्याचवेळात पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न के ला. परंतु त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. डम्पिंगयार्डला वारंवार आग लागते. आगीच्या विषारी धुरामुळे नागरिकांना राहणे कठीण झाले आहे. यासाठी डम्पिंगयार्ड येथून हटविण्यात यावे, अशी आंदोलकांनी मागणी केली. चार तासानंतर आंदोलक शांत झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानतंर कचऱ्याच्या गाड्या सोडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी डम्पिंगयार्डला आग लागली होती. तीन-चार दिवस ही आग धुमसत होती. आगीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता पुन्हा आग लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)अग्निशमन विभागाच्या नऊ गाड्या तैनातभांडेवाडी येथील डम्पिंगयार्डला आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नऊ गाड्या थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचल्या. दुपारपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचाही वापर करण्यात आला.
डम्पिंग यार्डात येणाऱ्या कचरा गाड्या रोखल्या
By admin | Published: April 11, 2017 2:04 AM