नागपूर : ‘बुरा न मानो होली है.’. म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्त हस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, रंगांचा बेरंग होऊ देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पूर्वी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली जायची. परंतु, आता रसायनयुक्त रंग आले आहेत. याचा परिणाम धुळवडीला रंग खेळल्यावर दिसून येतो. जास्त ‘केमिकल्स’ रंगांमध्ये असल्यास त्वचा, डोळे, कान, घसा यांना त्रास होऊ शकतो. दरवर्षी धुळवडीनंतर इजा झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. रासायनिक कारणामुळे डोळ्यात होणाऱ्या इजांमध्ये १८ टक्के प्रमाण हे होळी हलगर्जीपणे खेळण्यामुळे होतात. रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचाच साज चढावा आणि कोणत्याही हानीशिवाय सण साजरा करा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
- केमिकल रंग त्वचेला घातक - डॉ. मुखी
मेडिकलच्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. जयेश मुखी म्हणाले, एरवी अनेक जण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. मात्र, रंगपंचमीच्या दिवशी नेमके आपल्या चेहऱ्यावर काय लावले जात आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. सुरक्षित रंगपंचमी खेळायची असेल तर नैसर्गिक रंगांचाच वापर करावा. शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे कपडे घालावे. रंग खेळण्याआधी त्वचेला, केसांना खोबरेल तेल लावा. रंग काढण्यासाठी साबणाऐवजी दूध, बेसन लावा. आंघोळीनंतर माश्चरायजर लावा. त्वचा लाल झाल्यास, खाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- रंग खेळताना डोळे जपा - डॉ. चव्हाण
मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण म्हणाले, कृत्रिम रंगांमध्ये वाळू, काच पावडर आणि शिसे यांसारखे पदार्थ असतात. ज्यामुळे ईजा किंवा अंधत्व येऊ शकते. चमकी असलेल्या रंगांमध्ये काचेसारखा पदार्थ असतो. ज्याने बुबुळांवर जखम किंवा डोळा लाल होऊ शकतो. म्हणून रंग खेळताना गॉगल वापरा. रंगांचे फुगे सर्वात जास्त धोकादायक ठरतात. म्हणून होळी जपून खेळा.
अशी घ्या काळजी
- कृत्रिम रंगांचा वापर टाळा.
- बुबुळावर जर खरचटले असेल, इजा झाली असेल तर लगेच नेत्रतज्ज्ञाकडे जा.
- डोळ्यांच्या भोवती क्रीम लावल्याने रंग निघून जाण्यास मदत होते.
- चश्मा किंवा गॉगल्सचा वापर करा.
- होळीमध्ये डिस्पोसेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरा.
- रंग लावताना डोळे घट्ट बंद करा.
- जर डोळ्यात रंग गेला तर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. जवळच्या नेत्रतज्ज्ञास भेट द्या.