नागपूर : कोरोनाचा दुसरी लाट ओसरत असताना ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ने चिंता वाढविली आहे. उमरेडमधील एकाच घरामध्ये १० जणांना कोरोनाची झपाट्याने लागण झाली आहे. याची गंभीर दखल घेत नीरीने त्यांचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पुढील दोन दिवसात अहवाल येण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाचे अहवालाकडे लक्ष लागले आहे. सध्या या ‘डेल्टा प्लस’ संशयित रुग्णांना उमरेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) ठेवण्यात आले आहे. तर नवा ‘व्हेरिएन्ट’च्या संशयित चार रुग्णांचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. हे रुग्ण आमदार निवासाच्या ‘सीसीसी’मध्ये आहेत.
कोरोनाचा ‘नवा व्हेरिएन्ट’ किंवा ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ रुग्णांच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या नाहीत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व मेडिकल रुग्णालयांना याबाबत वेगळ्या सूचना देण्यात आलेल्या नसल्याची माहिती आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले,‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’चा रुग्ण जरी आला तरी त्याची लक्षणे पाहूनच कोरोनाच्या वॉर्डात किंवा आयसीयूमध्ये दाखल केले जाईल. लक्षणे सौम्य असेल व ऑक्सिजन पातळी सामान्य असेल तर रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना केल्या जातील. या रुग्णासाठी वेगळ्या औषधी नाहीत. कोरोनाच्या उपचारात असलेल्या औषधी दिल्या जातील. कोरोनाच्या नवीन प्रकाराचा विषाणू किती धोकादायक आहे, याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे.
- कोरोना विषाणूमध्ये झालेला बदल
:: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमध्ये ‘ई४८४क्यू’ आणि ‘एल४५२ आर’ अशी दोन ‘म्युटेशन’ आढळून आली आहेत.
:: ‘जिनोम सिक्वेंन्सिंग’साठी महाराष्ट्रातून गोळा केलेल्या नमुन्यांपैकी १५ ते २० टक्के नमुन्यात ‘म्युटेशन’ आढळून आले आहे.
:: नागपुरात म्युटेशन झालेले पाच प्रकार दिसून आले आहेत.
:: नागपूरच्या मेयोमधून महिन्याला ३० नमुने ‘जिनोम सिक्वेंन्सिंग’साठी पाठविले जात असून, अद्याप एकाही नमुन्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.