रात्री उशिरापर्यंत शिक्षक जि.प.मध्ये नागपूर: अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची अंतिम यादी ७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होती. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक यादीच्या प्रतीक्षेत शिक्षण विभागात ताटकळत बसले होते. रात्री ८ वाजताच्या सुमारास शिक्षकांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला, परंतु यादी न लागण्याचे ठोस कारण त्यांच्याकडून न मिळाल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला. गुरुवारपासून समुपदेशनाला सुरुवात होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांपर्यंत ही माहिती कशी पोहचणार असा सवाल शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना केला. शासनाकडून समायोजनाच्या बाबतीत यापूर्वी आलेल्या वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबरला अतिरिक्त शिक्षकांची अतिंम यादी जाहीर होऊन ६ व ७ सप्टेंबरला समुपदेशन होणार होते. परंतु मोठ्या संख्येने शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने वेळापत्रकानुसार शिक्षण विभागाला यादी जाहीर करता आली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने ७ सप्टेंबरला अंतिम यादी जाहीर करून ८ व ९ सप्टेंबरला समुपदेशन करण्यासंदर्भात सूचना लावली होती. अतिरिक्त शिक्षकांच्या आक्षेपावर सुनावणी घेऊन बुधवारी अंतिम यादी लावणे अपेक्षित होते. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयात यादीच्या प्रतीक्षेत होते. परंतु कोणत्याही अतिरिक्त शिक्षकांना आक्षेपावर सुनावणीचा निर्णय दिला नाही. रात्री उशिरापर्यंत कार्यालयाच्या फलकावर यादीसुद्धा लागली नाही. गुरुवारी समुपदेशानाची प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात ८८६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांची यादी नाही, शाळांना सूचना नाही, अशा परिस्थितीत समुपदेशन शक्य नाही. त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेला आणखी वेळ द्यावा, अन्यथा ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न बेजबाबदारपणे हाताळत असल्याचा आरोप विमाशिचे आनंदराव कारेमोरे, प्रमोद रेवतकर, कैलास राऊत, धनराज राऊत, दिलीप बांबल यांनी केला आहे. समायोजनाच्या प्रक्रियेत शिक्षकांची मानसिक प्रताडणा होत आहे. समायोजनासंदर्भात अतिरिक्त शिक्षकांच्या आलेल्या तक्रारी लक्षात घेता त्यावर शहानिशा करून शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे यांनी शिक्षण उपसंचालकांना केली आहे. दरम्यान अतिरिक्त शिक्षकांच्या प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता, समायोजनाच्या प्रक्रियेवर तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलचे सचिव बाळा आगलावे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
अंतिम यादीच्या प्रतीक्षेत शिक्षक ताटकळत प्रक्रियाच रद्द करण्याची संघटनांची मागणी :
By admin | Published: September 08, 2016 2:41 AM