नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार नसला, तरी नागपुरात विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ व १५ या दोन्ही दिवशी ड्रॅगन पॅलेस, बेझनबागसह नागपुरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांद्वारे धम्मचक्र प्रवर्तनाचा जागर होणार आहे. यानिमित्त राजकीय पक्षांनीही आपले मेळावे आयोजित केले आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीचा परिसर सजविण्यात आला. ठिकठिकाणी पंचशील ध्वज आणि रोषणाई करण्यात आली आहे. यंदा दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा नसला, तरी कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने आणि राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिल्याने अनुयायी येतील. त्यांच्यासाठी दीक्षाभूमीची दारे उघडण्यात आली. या संपूर्ण तयारीचा आढावा आणि पाहणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी बुधवारी दुपारी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम रद्द केला असला, तरी दीक्षाभूमीची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भिक्खु संघ व स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण होईल. तसेच १५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येईल. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. अखेरची पाहणी करण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास भदंत ससाई आणि डॉ. फुलझेले यांनी संपूर्ण दीक्षाभूमी परिसर, स्तुपाच्या आत, मुख्य प्रवेशव्दार आणि इतर आवश्यक ठिकाणांची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
- ड्रॅगन पॅलेसमध्ये विशेष बुद्ध वंदना व स्पर्धा परीक्षा
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दोन दिवसांचा धम्मचक्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ड्रॅगन पॅलेस विविध रोषणाईने सजवण्यात आले आहे. या महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होईल. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले जाईल. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. ५ वी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होतील. १५ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता मुख्य समारंभ होईल. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील.