नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने विद्युत सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ११ ते १७ जानेवारी २०१६ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. सोमवारी कस्तुरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांनी विद्युत सुरक्षा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून या सप्ताहाचे उद्घाटन केले. चित्ररथासह ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरविण्यात आली. या रॅलीचे आयोजन नागपूर विभागाचे विद्युत निरीक्षक, अधीक्षक अभियंता, विद्युत निरीक्षण मंडळ व विदर्भ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, विद्युत निरीक्षक मीनाक्षी वाठोरे, विदर्भ इलेक्ट्रीकल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन खिरवडकर, सचिव सुधीर देशमुख, विद्युत कंत्राटदारांचे प्रतिनिधी आर.पी.देशमुख, देवा ढोरे, अशोक ढोरे, विजय कारमोरे, अशोक पराड, शरद दुरुगकर आदी उपस्थित होते. विजेमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्र मांचे आयोजन करून जनजागृती केली जाणार आहे. यात शहराच्या विविध भागात एलईडी डिस्प्ले लावण्यात येतील. जयस्तंभ चौक, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, विमानतळ टी-पॉर्इंट, व्हेरायटी चौक, महापालिका मुख्यालय, मेडिकल चौक आदी ठिकाणी विद्युत सुरक्षेसंदर्भात पोस्टर महापालिकेतर्फे लावण्यात येतील. शहरातील चित्रपटगृहात लघुमाहिती ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे यांनी दिली.विद्युत दुर्घटनांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शाळा, कारखाने, झोपडपट्ट्या अशा ठिकाणी चित्ररथ फिरवून जनजागृती केली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातही जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती खोंडे यांनी दिली.(प्रतिनिधी)
रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेचे प्रबोधन
By admin | Published: January 12, 2016 3:06 AM