नागपूर : वय लहान असले तरी राष्ट्र व समाजाप्रति असणारी समर्पण भावना, ताल व लयीचे भान ठेवून केलेले संचलन, प्रत्येक हालचालीत शिस्तीचे दर्शन आणि चेहऱ्यावर झळकणारा प्रखर आत्मविश्वास. उपराजधानीतील बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा रविवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
२४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन शहरातील ११ नगरांतील विविध मैदानांवर करण्यात आले होते. सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझीम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाअगोदर बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.
अतिथींमध्ये श्रीधरराव गाडगे, योगेश आचार्य, नीलिमा काळभूत, प्रसाद शिंगेवार, रमेश पसारी, राजेश कापसे, डॉ. जयंत इटकेलवार, पंजाबराव आव्हाले, सुधीर दप्तरी, डाॅ. अशोक कांबळे, पंकज कोठारी, विजय कैथे, अभिषेक मिश्रा, विजय परिहार, महेश सागळे, संजय श्रीवास्तव, डॉ. मनीष श्रीगिरीवार, ॲड. सुवर्णा चुटे, डॉ. अशोक कामडी, डॉ. रवी मोर यांचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी बाल व शिशु स्वयंसेवकांना शिस्त, संस्कार, व्यायाम, वडीलधाऱ्यांचा आदर, नियमित अभ्यासाचे महत्त्व, देशभक्ती व देशकार्य, सेवेचे महत्त्व इत्यादींवर मार्गदर्शन करण्यात आले.
शनिवार-रविवार दोन्ही दिवस संचलनसंघातर्फे शनिवार व रविवारी दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्य अतिथींनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. भवानीनगर (पुनापूर मार्ग), मोहितेनगर (ज्ञानेश्वर मंदिर मैदान), पारडी नगर (एनआयटी मैदान, भांडेवाडी), अनंतनगर (रामदेवबाबा मंदिर परिसर), रामदासपेठ (अटल मैदान काचिपुरा), अयोध्यानगर (गजानन महाराज मंदिर मैदान, जुना सुभेदार ले आऊट), जानकी नगर (नागपुरे हॉल परिसर), म्हाळगी नगर (महालक्ष्मीनगर मैदान), नंदनवन नगर (हनुमान मंदिर, श्रीनगर), रेशीमबाग (सुदामपुरी परिसर) व खरबी नगर (ईस्ट पॉइंट स्कूल मैदान, खरबी) येथे या उत्सवांचे आयोजन करण्यात आले.