नागपूर : विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला जल आणि मलजल क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पीपीपी आॅपरेटर म्हणून वॉटर डायजेस्ट वॉटरचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय ग्रामविकास, पंचायत राज आणि पेयजल व स्वच्छता मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांच्या हस्ते स्वीकारला.या समारंभात परीक्षक मंडळाचे सदस्य डॉ. पवनकुमार लाभसेटवार, टेरीचे सहसंचालक अंशुमन, डब्ल्यूएबीसीओएसचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर.के. गुप्ता, श्रीराम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. के.एम. चाको, जल व मलजलचे सल्लागार सतीश मलिक, युनेस्कोचे डॉ. राम भुज आणि डॉ. जगदीशकुमार बसीन उपस्थित होते. लखानी म्हणाले, हा पुरस्कार नागपूरचे नागरिक, महापालिकेचे अधिकारी आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना समर्पित करतो. त्यांच्या सहकार्याने नागपूरच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बदल घडवून आणणे शक्य झाले. विविध माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. पीपीपी तत्त्वावरील नागपूर २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्पाची भारतातील सर्वोत्तम प्रकल्प म्हणून निवड झालेली असून पंतप्रधानांनी २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी आणि अमृत योजनांच्या उद्घाटनप्रसंगी ५०० महापौर आणि आयुक्तांसमक्ष या प्रकल्पाची प्रशंसा केली होती. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी काम करीत असलेल्या ओसीडब्ल्यूने सर्वप्रथम बल्क पाणी व्यवस्थापन सुरळीत करण्यावर भर दिला. प्रारंभी संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा करणे हे उद्दिष्ट होते आणि ते गाठण्यात ओसीडब्ल्यूला बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. पूर्वी एकदिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्य २.७ लाख नागरिकांना आता दररोज पाणीपुरवठा होत आहे. (वा.प्र.)
विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरला पुरस्कार
By admin | Published: March 27, 2016 2:45 AM