नागपूर : प्रत्येक नागरिकाचे मानसिक स्वास्थ्य हे सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे. मात्र मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्या नागरिकांवर वेळेत उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच अशा रुग्णांकडे लक्ष देऊन त्यांचे योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या आहेत. येत्या १० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये १३ प्राथमिक
आरोग्य केंद्रामध्ये वेगवेगळ्या दिवसाला जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मुख्य शिबिर पाटणसावंगीला ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले. प्रादेशिक मनोरुग्णालय व टाटा ट्रस्टचे तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक तेथे रुग्णांची तपासणी करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील डॉक्टर उपस्थित राहणार असून, यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपर्कात नागरिकांनी राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
- या समस्या असतील तर करा तपासणी
एकसारखे नकारात्मक विचार येणे, पश्चात्ताप वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भविष्याविषयी विनाकारण काळजी वाटणे, आपण काही कामाचे नाही, आपले आयुष्य व्यर्थ आहे, जगण्यात काही अर्थ नाही, असे वाटणे हे नैराश्याचे लक्षण आहे. एखाद्याच्या बाबतीत भूक मंदावणे, सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे, शरीरसंबंधाची इच्छा न होणे, बेचैन वाटणे, कुठेच लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे, निर्णय घ्यायला अवघड जाणे, अशी लक्षणे वारंवार दिसत असल्यास किंवा जगण्याप्रति आत्मीयता वाटत नसल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा सदस्याची तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.