सावनेर : स्थानिक तहसील कार्यालय आणि पाेलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यामाने सावनेर शहरात साेमवारी (दि. ३) काेराेना संक्रमण आणि प्रतिबंधक उपाययाेजना याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी गरजूंना मास्कचे वितरण करण्यात आले.
काेराेना संक्रमण व मृत्युदर राेखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शहरात भ्रमंती करीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्कचा नियमित वापर करणे, मास्क व्यवस्थित लावणे, गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययाेजनांबाबत माहिती देत जनजागृती केली. शिवाय, घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही केले. या उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. एवढेच नव्हे तर शहरातील गरीब व गरजूंना माेफत मास्कचे वितरण केले. या अभियानात उपविभागीय अधिकारी (महसूल) अतुल म्हेत्रे, उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर, तहसीलदार सतीश मसाळ, ठाणेदार मारुती मुळूक, सहायक पाेलीस निरीक्षक सतीश पाटील, पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे, नायब तहसीलदार गजानन जवादे, ॲड. शैलेश जैन, नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, मंडळ अधिकारी राठाेड, पाेलीस हवालदार सुनील व्यवहारे, बाेरकर, अशाेक आठवले, तलाठी गणेश मोरे यांच्यासह महसूल व पाेलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते.