गावस्तरावर नागरिकांना मार्गदर्शन
कळमेश्वर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका कळमेश्वर तालुक्याला बसला आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यावर त्यांना म्युकरमायकोसिसने ग्रासले आहे. ग्रामीण भागातही अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत आजाराबाबत गावागावात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली. सदर आजार वाढू न देण्याकरिता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची संभावना आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील मातांना लहान मुलांमधील कोरोना आजाराबाबत माहिती देणे. तसेच लहान मुलांमध्ये कोविड-१९ चा संसर्ग झाल्यानंतर ती मुले एकटीच विलगीकरण किंवा दवाखान्यामध्ये राहणे शक्य नाही. त्याकाळात त्यांच्या सोबत पालकदेखील असणे आवश्यक आहे. त्यामुळे १३ वर्ष वयापर्यंतच्या मुलांच्या मातांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराचा जास्त धोका असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे कळमेश्वर तालुक्यातील ज्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे. त्यांची मधुमेहाबाबत तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून भविष्यात म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका टाळणे शक्य होईल. त्याचप्रमाणे कोविड-१९ आजाराचे निदानाचे अनुषंगाने ६ मिनिट चालण्याची चाचणी ही अत्यंत महत्त्वाची असून त्याबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याने जनजागृती कार्यक्रमातून जनतेला माहिती देण्यात येत आहे.
या दृष्टिकोनातून तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींना उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कार्यकारी अभियंता सतीश आंभोरे, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्गदर्शनाखालील तहसीलदार सचिन यादव, गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे भेट देऊन जनतेला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी ४ ग्राम पंचायतीला भेट देणार असून त्यापैकी शुक्रवारी धापेवाडा, आदासा (सोनपूर), बोरगाव (बु), निळगाव, मोहगाव, चाकडोह, बुधला, लोहगड येथे भेट देण्यात आली. सदर जनजागृती सभेत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.