चिनी कलावंतांचे आकर्षक नृत्याचे सादरीकरण : बुद्ध महोत्सवाचा आज समारोप नागपूर : चीनमध्ये बुद्धिस्ट लोक चहाला तथागत बुद्ध यांची पापणी मानतात. चहा म्हणजे जागरुकता. बुद्ध धम्मामध्ये जागृतीला फार महत्त्व आहे. याचे सादरीकरण ‘चान टी म्युझिकल’मधून करण्यात आले. जाणीव, समजूत, बुद्धी, सर्वज्ञता, उपदेश, सूचना, जागृती, प्रज्ञा, करुणा असे अनेक अर्थ चिनी कलावंतांनी आपल्या आकर्षक नृत्य शैलीने सादर केले. ‘बुद्ध’ या शब्दातील प्रगल्भता, व्यापकता आणि सखोलताचे दर्शन या कलावंतांनी घडून आणले. नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स (बानाई), बोशान झेंगझुए टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्किव्ह आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने हा आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला ‘चान टी म्युझिकल’ कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील असाच राहिला. यात ८५ चिनी कलावंतांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात वसंत ऋतूत चहाच्या आनंदाने झाली. या ऋतुत चहाच्या झाडांना नवी पालवी फुटते. ही नवी पालवी म्हणजे, नव्या जीवनाची जाणीव. ही जाणीव कलावंतांनी सादर केली. त्यानंतर चहाच्या स्तुतीमध्ये ज्ञान धारणाचे महत्त्व विषद केले. ज्ञान आणि चहाची एकात्मता, ज्ञान आणि चहा हा विषय कलावंतांनी आपल्या नृत्यातून सादर केले. उन्हाळी ऋतूत आई व मुलीमधील प्रेम, क्षमायाचना, आनंद, बौद्ध जीवनाला कमळाच्या फुलाची दिलेली उपमा, आदीच्या सादरीकरणाने उपस्थित लोक थक्क झाल्यावाचून राहिले नाही.(प्रतिनिधी) महामंगल सुत्ताचे चिनी भाषेत सादरीकरण तथागत गौतम बुद्ध यांनी मानवाच्या अकरा प्रकारचे कल्याण (मंगल) सांगितले आहे. त्याला महामंगल सुत्त म्हणतात. हे सुत्त यावेळी चिनी कलावंतांनी आपल्या भाषेत सादर केले. या जगात जे-जे सुंदर ते-ते आत्मसात करा. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा दिसणार नाही, असा संदेशही त्यांनी दिला. पारंपरिक वेशभूषेमुळे हे नृत्य आणखी आकर्षक ठरले. चिनी भाषेतील गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले असले तरी नृत्यातील भाव उपस्थितांच्या लक्षात येत होते. धम्माला समोर घेऊन जा या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या चिनी भाषेत बोशान झेंगझूऐ टेंपल, शांगडोन चीनचे भन्ते रेन दा यांनी लोकांशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माला आत्मसात करा. त्याला समोर घेऊन जा. त्याचा प्रचार आणि प्रसार करा. यावेळी त्यांनी लोकमित्र यांना चायना भाषेतील कॅलिग्राफी भेट म्हणून दिली. उद्या रविवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नृत्य, मैत्री गीतातून बुद्ध महोत्सवाचा समारोप होणार आहे.
‘चान टी म्युझिकल’मधून ज्ञानाची जागृती
By admin | Published: February 26, 2017 2:29 AM