नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर आणि थॅलेसेमिया व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया यांच्यात थॅलेसेमिया आणि सिकलसेल प्रकल्प सुरू करण्याचा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये या दोन्ही आजारांची जनजागृती व विद्यार्थ्यांच्या आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व थॅलेसेमिया व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. विकी रुघवानी यांनी करारावर मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या. जीवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणजे सिकलसेल व थॅलेसेमिया. विवाहापूर्वी घेतलेल्या दक्षतेमुळेच हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. यााठी पदवी अभ्यासक्रमापूर्वी सिकलसेल चाचणी अनिवार्य करण्याची मागणी थॅलेसेमिया व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रुघवानी यांनी लावून धरली होती. आता ती पूर्ण होताना दिसून येत आहे.
या प्रकल्पांतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या चार जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांमध्ये थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराबाबत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांची चाचणीसद्धा करण्यात येईल. यात जे विद्यार्थी बाधित आढळून येतील त्यांचे समुपदेशन केले जाईल. प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी करण्याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राजेश सिंग आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. चौधरी म्हणाले की, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा सूचना दिल्या जातील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा अनोखा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची गरज
डॉ. रुघवानी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये या दोन्ही आजाराची जनजागृती केल्यास व त्यांची चाचणी करून बाधितांचे समुपदेशन केल्यास हे दोन्ही आजार संपुष्टात येऊ शकतात. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.