देवलापार : नजीकच्या वडांबा (ता. रामटेक) येथील विक्तुबाबा लहान मुलांच्या मदतीने पथनाट्याद्वारे परिसरातील गावांमध्ये काेराेनासंदर्भात जनजागृती करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च ते स्वत: करीत आहेत.
यात ही लहान मुले काेराेनाचे किती टप्पे आहेत, त्याचे दुष्परिणाम, उपचारासाठी वैद्यकीय सल्ला कुठे घ्यायचा, फिजिकल डिस्टन्सिंग, हात साबण किंवा हॅण्डवाॅशने धुणे, आयसाेलेशन, घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करणे यासह महिलांवर हाेणारे विविध अन्याय, त्याचा विराेध करायचा कसा, तरुणींनी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणे, बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान, महिला सक्षमीकरण कार्यक्रम यासह अन्य बाबींवर समर्पक मार्गदर्शन करीत जनजागृती करीत आहेत. आदिवासीबहुल भागात राबविला जात असलेला हा उपक्रम स्तुत्य असून, या उपक्रमाला आपण सर्वताेपरी मदत करू, अशी ग्वाही ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी देवलापार (ता. रामटेक) येथे आयाेजित कार्यक्रमात दिली.