नागपूर : रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी होऊन पोत घटत आहे. यामुळे कृषी विभागाने रासायनिक खतांच्या मर्यादित वापरासाठी जनजागृती सप्ताह राबविला आहे. ११ मेपासून या सप्ताहाला सुरुवात झाली आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पोत घटत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. यासाठी जमिनीची सुपीकता पातळी व पीक उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय, जैविक व रासायनिक असा एकात्मिक वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. या मोहिमेंतर्गत रासायनिक खत बचतीसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रासायनिक खत बचत मोहीम सप्ताह राबविला जात आहे.
या सप्ताहामध्ये जमीन सुपीकता निर्देशांक फलकाच्या आधारे खतमात्रा वापरणे, जैविक खतांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे, ५० टक्के रासायनिक खताची बचत व ४० टक्के खत खर्च कमी होण्यासाठी युरिया-डीएपी ब्रिकेटचा भात पिकाकरिता वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, नत्र खताच्या बचतीसाठी सोयाबीन, तूर आंतरपीक पद्धतीचा वापर करणे, हिरवळीचे खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत देणे, नत्राचा दुसरा हप्ता जमिनीमध्ये न टाकता दोन टक्के युरिया फवारणीद्वारे देणे, असे पर्याय सुचविले आहेत. या मोहीम सप्ताहात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.
...
शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार
रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी व कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १,८२४ गावांमध्ये जमीन सुपीकता फलक प्रदर्शित करून त्याचे वाचन व मार्गदर्शन केले जाणार आहे. खरीप हंगामामध्ये शेती शाळेच्या माध्यमातून रासायनिक खत बचतीबाबत जनजागृती केली जाणार आहे.
...