लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कलेच्या प्रांतात कलावंतांचीच मर्जी चालते आणि त्याच्या मर्जीला धक्का लागेल असले कृत्य कुणाकडूनही झाले तर त्याचा हिरमोड होतो. मात्र, त्याचे आविष्कार त्या स्थितीतही सुरू असतात. कलावंतांचा हिरमोड होऊ नये, ही खबरदारी रसिकांची, राज्यकर्त्यांची अन् सामान्यांनीही घ्यावी लागते. कारण कलावंत घडविणे, ही भविष्यकालीन संवेदनशील नागरिक निर्मितीची प्रक्रिया आहे. त्यात कोण, कसे सहकार्य करतो? हा भाग वेगळा. ही जबाबदारी जो कुणी स्वीकारेल, तो त्याच्या वाट्याला येणाऱ्या पांथस्थाला मार्गस्थ करतो. ही नाळ ओळखून शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेवर कलावंतांचा मेळा भरविण्याचा निर्धार केला आणि शहरापासून १८ किमी दूर असलेल्या चक्कीखापा, बोकारा येथे एक ‘आर्ट हाऊस’ साकारले. गोधनी रोडवरील बोकारा परिसरात असलेल्या चक्कीखापा येथे भोसला मिलिटरी स्कूल असलेल्या टेकडाच्या शेजारी निर्जन निसर्गरम्य स्थळी प्रकाश बेतावार आणि त्यांची पत्नी मीना बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेमध्ये ‘युफोरिया-ओपन एअर आर्ट हाऊस’ साकारले आहे. स्वत:चा खासगी व्यवसाय सांभाळत असताना, त्यांच्यातील कलासक्त रसिकाला आणि कलावंताला हे आर्ट हाऊस साकारण्याची प्रेरणा मिळाली. विविध जंगली फळाफुलांची झाडे, मचाण अन् कलावंतांचे मन रमेल, अशी व्यवस्था त्यांनी स्वपरिश्रमाने येथे साकारली आहे. या रम्य स्थळी कुंचला घेऊन कॅनव्हॉसवर उकेरावयाच्या मानवीय संवेदनेला प्रोत्साहन मिळेल, असे दिलखुलास वातावरण तयार करण्यात आले आहे. येथे ते स्वत: दररोज सकाळी येतात, निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत कोरे कॅनव्हॉस टांगतात आणि त्यावर मनाच्या कप्प्यातून उफाळलेल्या भावभावनांना आकार देत या ‘आर्ट हाऊस’ रंगसंगतीने मळवून टाकतात. ते इथे एकटेच नसतात, तर अनेक कलावंतांना सोबत घेऊनही येतात आणि त्यांना त्यांच्या मनातील मुक्तछंद आविष्काराला आकार देण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात.येथेच त्यांनी ‘चांद्रयान टू’ची चित्रकृती खास पंतप्रधानांसाठी साकारली आहे. ७ सप्टेंबरला चंद्रावर चांद्रयान उतरणार होते आणि त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार होते. तेव्हा, ही चित्रकृती मोदींना भेट देण्याची तयारी होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ती इच्छा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. त्यांचे हे ‘आर्ट हाऊस’ सर्व कुंचलाधारकांसाठी नि:शुल्क उघडे आहे. एवढेच नव्हे तर ज्या ज्या कलाप्रकारातील कलावंतांना निरंकुश व्हायचे आहे, त्या संगीत, नाट्य, लेखक, नृत्य, शिल्पकार कलावंतांना येथे हक्काचे मोकळे व्यासपीठ सहज उपलब्ध आहे.नागपूरचा संपूर्ण इतिहास शिल्पकृतीत साकारायचा आहे - प्रकाश बेतावारओडिशा तटावर सुदर्शन पटनायक ज्याप्रकारे कोणतीही घटना वाळुकाकृतीत साकारतात, त्याच धर्तीवर मलाही नागपुरात नागपूरचा संपूर्ण इतिहास वाळुकाकृतीमध्ये साकारायचा आहे. गोंड राजाच्या इतिहासापासून ते आजच्या मेट्रोपर्यंतच्या कलाकृती पुढच्या पिढीला दाखवायच्या आहेत. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. शिवाय, कलावंतांनीही पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रकाश बेतावार यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने, ओपन एअर स्टुडियोच्या धर्तीवर हे आर्ट हाऊस साकारल्याचे बेतावार यांनी सांगितले.
शहर से दूर, कुदरत की आगोश में... कुंचला चालतो कॅनव्हॉसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:34 PM
शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेवर कलावंतांचा मेळा भरविण्याचा निर्धार केला आणि शहरापासून १८ किमी दूर असलेल्या चक्कीखापा, बोकारा येथे एक ‘आर्ट हाऊस’ साकारले.
ठळक मुद्देचक्कीखापा येथे बेतावारांनी साकारले ‘आर्ट हाऊस’‘चांद्रयान २’ वाट बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची