सामाजिक भावनेतून काम करणाऱ्यांना स्वत:ची नाही तर कुटुंबीयांची चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. आणखी किती दिवस कायम राहील, हे सांगता येणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपलेेदेखील जवळ येत नाही. अशा लोकांची संख्या वाढतच आहे. मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या मनात सामाजिक भावना आहे. त्यांना स्वत:ची चिंता नाही. परंतु दुर्दैवाने कोरोनाची बाधा झाली. यात मृत्यू झाला तर आपल्या कुटुंंबीयांचे काय?असा प्रश्न या कोरोना योद्धांच्या मनात आहे. कोरोना योद्धांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मनपातील १४ योद्धांच्या कुटुंबीयांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
नागपूर शहरात १६ स्मशानभूमी आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपाच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातील दहा कर्मचाऱ्यांची टीम आहे. बाधिताचा मृत्यू झाल्यास या टीमला मेसेज मिळतो. त्यानंतर या टीममधील कर्मचारी वाहनासह रुग्णालयात पोहचतात. मृतदेह प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून वाहनातून स्मशानभूमीत आणतात. अंत्यसंस्कार करताना व मृतदेह आणताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. संसर्ग होऊ नये यासाठी प्लास्टिकचा ड्रेस, पीपीई किट व सॅनिटायझरचा वापर करूनच अंत्यसंस्कार करतात.
...
काही जणांकडून अपमानास्पद वागणूक
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कार करीत नाही. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीवर येण्याचे टाळतात. त्यांना आपल्या जीवाची भीती आहे. दुसकरीकडे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अनेक जण चांगले वागत नाही. अपमानास्पद वागणूक देतात. असे असूनही पथकातील कर्मचारी वाद न घालता आपले कर्तव्य बजावत आहेत.
....
खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार ()
कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करताना खबरदारी घ्यावीच लागते. सुरक्षा म्हणून पीपीई किट, मास्क व विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालून व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. घाटावरून घरी परतल्यानंतर दाराबाहेर कपडे, बूट काढून स्वत: निर्जंतूक व्हावे लागते. त्यानंतर अंघोळ करून घरात प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत घरातील सदस्य संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. मागील वर्षभरापासून हा नित्यक्रम सुरू आहे.
रमेश बिसमोगरे, सफाई कर्मचारी, मनपा
....
घरच्या सदस्यांपासून स्वत:ला दूर ठेवतो ()
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर आपलेदेखील जवळ येत नाही. रुग्णालयातून मृत्यूचा कॉल आला की आमची टीम वाहनासह पोहचते. मृतदेह गाडीत ठेवण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व कार्य आमच्या टीमला करावे लागते. अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतो. सॅनिटायझर व किटचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. घाटावरून घरी पोहचल्यानंतर अंगावरील कपडे, बूट पूर्णपणे निर्जंतूक करून अंघोळ केल्यानंतरच घरात प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत घरातील सदस्य संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते.
मोहम्मद सलीम, सफाई कर्मचारी, मनपा
....
वर्षभरापासून अंत्यसंस्काराचे काम
मृतदेह गाडीत ठेवण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व कार्य आमच्या टीमला करावे लागते. अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतो. सॅनिटायझर व किटचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. जोखमीचे काम करूनही अनेकदा मृताच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळत नाही. याचे वाईट वाटते. परंतु कोणताही वाद न करता आमचे पथक अंत्यसंस्काराचे काम मागील वर्षभरापासून करीत आहे. यात आम्हाला समाधान आहे.
कुणाल देलीकर, सफाई कर्मचारी, मनपा
....