लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही. उपराजधानीतील सामाजिक सौहार्दाला कसलाही धक्का लागला नाही. सत्ताकेंद्र म्हणून नागपूरकडे देशाचे सध्या लक्ष आहे. दिवाळी, प्रकाशपर्व, ईद मिलाद आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी असा सारखा दोन आठवड्यांपासूनचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या शहर पोलिसांना शनिवारी अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याचे कळाले आणि पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच उपराजधानीत बंदोबस्ताचे नव्याने नियोजन केले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शुक्रवारी सायंकाळी सुमारे एक तासभर वायरलेसवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कनेक्ट करून अतिसतर्कतेच्या उपाययोजनांवर चर्चा केली. ठिकठिकाणी नाकेबंदी करून रात्रीपासून गस्त वाढविली. शनिवारी सकाळी ७ वाजतापासून पोलीस आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत (सीपी टू पीसी) रस्त्यावर होते. सर्व गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, बसस्थानक, महत्त्वाची ठिकाणं, संवेदनशील वस्त्या आदी ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. ऐनवेळी धावपळ नको म्हणून पोलीस मुख्यालयात, नियंत्रण कक्षात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी चार दिवसांपूर्वीच विविध धर्मातील तसेच समाजातील ज्येष्ठांचा, मान्यवरांचा समावेश असलेल्या शांतता समितीची एक बैठक घेतली होती . या बैठकीत सर्वधर्मसमभाव जपणाºया नागपूर शहराच्या प्रतिमेला कसलाही धक्का लागणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना सोशल मीडियांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. प्रत्येक पोलीस अधिकारी पब्लिक कनेक्टिव्हीटीवर भर देऊन होते. त्याचाच अत्यंत चांगला परिणाम समोर आला. उपराजधानीत आज नेहमीसारखीच चहलपहल राहिली. बाजारपेठांतील वर्दळही रोजच्यासारखीच राहिली. घरगुती जबाबदारीला जयहिंद!अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बी. जी. गायकर येथे कार्यरत आहेत. मितभाषी, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे पुण्याला शुभकार्य असल्याने ते सुटीवर गेले होते. मात्र, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत आपली घरगुती जबाबदारीला तात्पुरता जयहिंद करत त्यांनी लगोलग नागपूर गाठले अन् कर्तव्यावर रुजू झाले.