सुनील वेळेकर
धापेवाडा : नागपूर जिल्ह्यात दमदार नेते असले तरी विदर्भाचे पंढरपूर असलेले कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा तीर्थक्षेत्र अजूनही विकासापासून दूर आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत धापेवाडा तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी अडीच वर्षापूर्वी निधी प्राप्त झाला. मात्र, स्थानिक राजकारणामुळे येथील विकासकामे ठप्प आहेत.
केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने मे २०१८ मध्ये स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत आदासा, धापेवाडा, वाकी, पारडसिंगा, छोटा ताजबाग, तेलंगखेडी व गिरड या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी ४४ कोटी ९८ हजार रुपये दिले. त्यात धापेवाडा हे ‘ब’ दर्जाचे पर्यटन क्षेत्र आहे. येथील स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान व परिसराच्या विकासासाठी ८ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये देण्यात आले. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विकास विभागाच्यावतीने ‘एनएमआरडीए’ला विकास कामांचे अधिकार व जबाबदारी देण्यात आली हाती. पर्यटन क्षेत्र विकासाअंतर्गत मंदिर परिसरात पर्यटन सौंदर्यीकरण, बैठक व्यवस्था, रस्ता व सुरक्षा व्यवस्थापन, सार्वजनिक प्रसाधनगृह, पार्किंग, दर्शन बारी, पायवाट, घाट विकास, लँडस्केप, घन कचरा व्यवस्थापन, भक्त निवास, जोड रस्ता, जलव्यवस्था, लहान मुलांसाठी पार्क, ५० हजार लीटर क्षमतेची भूजल जलसाठा टाकी व पाण्याची टाकी बनविणे आदी कामांचा यात समावेश आहे. या कामांसाठी निधीही मंजूर करण्यात आला. मात्र, या कालावधीत केवळ चंद्रभागा नदीघाटाच्या कामाला सुरुवात झाली असून तेही अपूर्ण आहे.
स्थानिक राजकारणाचा फटका
धापेवाडा पर्यटन क्षेत्र विकासाच्या दृष्टीने ३ वर्षांपूर्वी विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार या क्षेत्राचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान प्रशासनाला विश्वासात न घेता स्थानिक राजकीय नेते विकासकामांमध्ये ढवळाढवळ करत असून त्यामुळे नियोजनाप्रमाणे विकासकामे होत नसल्याची वास्तविक परिस्थिती आहे. सर्व विकासकामांची जागा निश्चित असून स्थानिकांच्या हस्तक्षेपामुळे ठरलेली विकासकामे इतरत्र हलविण्याचा प्रकार येथे सुरू आहे.
--
दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे १.५ कोटींचा विकास निधी इतरत्र हलविण्यात आला होता. केंद्र सरकाराच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी विकासकामांवर खर्च करण्याचा कालावधी ६ महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे या ६ महिन्यांत सर्व विकासकामे पूर्ण करणे शक्य नसल्याने हा निधीही परत जाईल. स्थानिकांनी राजकारण बंद करून मंदिर प्रशासनाला विश्वासात घेऊन विकासासाठी सहकार्य करावे.
- आदित्य प्रतापसिंह पवार, सचिव,
श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान, धापेवाडा