लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक सातत्याने बदलत आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षा उन्हाळ्यात घेतल्या जात असून, संक्रमणाचा वेग वाढल्याले याही परीक्षा स्थगित करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. ही अशी स्थिती असतानाच बी.ए. द्वितीय वर्षाच्या परीक्षात अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. विद्यापीठाची ही चूक विद्यार्थ्यांनी का भोगावी, असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरूंना न्याय मागण्याचे निवेदन दिले आहे.
बी.ए. द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेंतर्गत ९ एप्रिल रोजी मराठी साहित्याचा ऑनलाईन पेपर पार पडला. या पेपरमध्ये आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न उतरले होते. ही गोष्ट ताजी असतानाच २० एप्रिल रोजी पार पडलेल्या आवश्यक मराठीच्या प्रश्नपत्रिकेतही इतिहास विषयाचे प्रश्न विचारण्यात आली होती. विद्यापीठाच्या या चुकांमुळे विद्यार्थी मात्र गोंधळले आहेत. अभ्यासक्रमात नसलेले प्रश्न व भलत्याच विषयाचे प्रश्न आल्याने त्यांची उत्तरे अशी द्यावी, हा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे अनेकांना अपेक्षित उत्तरे सोडविता आलेली नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून रसिका भगत, प्रशांत पिल्लेवान, तुषार वडस्कर, स्वप्निल कोडवते, कामिनी भोवेर, कार्तिक कठाणे, ऋतुजा घोंगे, रितिक गुजरकर, वैष्णवी पवार, मोहिनी बागेश्वर, दामिनी गजबे, मीनाक्षी खंगाले या विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरूंकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.