लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी कुख्यात राजा लखन सिंग (वय २३) हा प्रयत्नरत होता. त्यामुळे कारागृहातून बाहेर आल्याच्या चार दिवसानंतरच त्याने बाबा ऊर्फ आनंद मनोहर चौधरी (वय ५२) याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी कुख्यात राजा आणि त्याचा साथीदार नाना ऊर्फ सुरेंद्र शेषमल पटेल (वय २२) याला अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून, त्यांची २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढवण्याच्या आरोपात कारागृहात गेलेला कुख्यात राजा चार दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. येतायेताच त्याने गिट्टीखदानमधील विविध भागात दहशत पसरवणे सुरू केले. धारदार शस्त्रे घेऊन तो फिरू लागला. दारूच्या नशेत चौकात उभा राहून तेथील लोकांना घाणेरड्या शिव्या देऊ लागला. आपली दहशत निर्माण झाली की खंडणी वसूलने सहजशक्य होते, हे माहिती असल्यामुळे राजा जाणीवपूर्वकच हे करत होता. रविवारी रात्री त्याने तसेच केले. दारूच्या नशेत तर्र होऊन तो कारमधून तीन साथीदारांसह व्हेटरनरी चौकातील लखन फसवार याच्या पानटपरीसमोर आला. तेथे त्याने आल्याआल्याच शिवीगाळ सुरू केली. यहां के लोग... है... असे म्हणून त्याने अनेकांना त्वेषाने बघितले. यावेळी तेथे उभा असलेल्या बाबा चौधरीने त्याला शिवीगाळ करू नको, एवढेच म्हटले. पहिल्यांदा मामा तूम हो क्या, तो टेंशन नही, असे म्हटले. नंतर पानटपरीवरून परत येताना राजाने त्याचा साथीदार नाना पटलेच्या कंबरेत लपवून ठेवलेला चाकू काढून बाबा चौधरीला भोसकले आणि चाकू घेऊन साथीदारांसह पळून गेला. बाबा चौधरी जागीच ठार झाला. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. माहिती कळताच गिट्टीखदान तसेच गुन्हे शाखेचा पोलीस ताफा तेथे पोहचला. दिनेश ऊर्फ रामराज यादव यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध करून आरोपी राजा तसेच नानाला अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मिळवला. फरार दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.