नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत बुद्ध व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती पुस्तकांची. दीक्षाभूमीवर भाकरीची शिदाेरी आणणारे भीम अनुयायी परत जाताना ज्ञानरुपी पुस्तकांची शिदाेरी घेऊन घरी जातात, कारण त्यातच त्यांना महामानवाने दिलेला उन्नतीचा मार्ग सापडताे. यावेळीसुद्धा पुस्तकांवरच अनुयायांचे लक्ष असून चर्चेत असलेल्या बाबासाहेबांच्या काही नव्या पुस्तकांची मागणी अधिक असल्याचे दिसून येत आहे.
‘भारतीय संविधान’ व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाला दरवर्षी प्रचंड मागणी असते. तसेच बाबासाहेबांचे स्वत: चे लेखन साहित्य आणि इतर लेखकांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्रग्रंथ याची आवड दरवर्षी वाढतच आहे. यावर्षी काही नव्या पुस्तकांची भर पडली आहे. बाबासाहेबांच्या लेखन साहित्याचे बरेच समीक्षणात्मक ग्रंथ यावेळी आले आहेत. त्यात जगभरात मागणी असलेल्या ‘दि प्राॅब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या समीक्षणात्मक लेखनाची सध्या चांगली चर्चा आहे.
याशिवाय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व साहित्य प्रकाशन समितीने यंदा प्रकाशित केलेल्या बाबासाहेबांच्या २३ व्या खंडाची नव्याने भर पडली आहे. यासह बाबासाहेबांचे साहित्य खंड-२ चे मराठी भाषांतर चर्चेत आहे. यामध्ये गाेलमेज परिषद, मुंबई विधिमंडळातील बाबासाहेबांची भाषणे व सायमन कमिशनसाेबत त्यांच्या संवादाचे लेखन समाविष्ट आहे. डाॅ. आंबेडकरांनी काढलेले वृत्तपत्र जनता खंड ३-३ व ‘१९३३ चा जनता’चा खास अंकाचे संकलनही यंदा प्रकाशित करण्यात आल्याचे समितीचे सदस्य सचिव डाॅ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले.
प्रशासक महिलांचे आत्मचरित्रही चर्चेतप्रशासनातील महिला अधिकारी व काही महिला साहित्यिकांचे आत्मचरित्र यंदा चर्चेत आहे. यात निर्वासित डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांचे आत्मचरित्र, विद्या पाेळ यांचे ‘जगणं कळतं तेव्हा’, शैलजा वाडीकर यांचे ‘मराठा मुलगी’ व छाया काेरेगावकर यांची ‘रिक्त विरक्त’ या ग्रंथांची चर्चा आहे. ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांच्या सूर्य गिळणारी मी’ ही कृतीही चर्चेत आहे.
हिंदी साहित्यातही बरेच नवे ग्रंथ
हिंदी साहित्यिकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी भाषांतर लक्ष वेधून घेत आहे. इतर लेखकांनी बाबासाहेबांच्या चरित्रग्रंथ व ‘भारत का संविधान’ या ग्रंथाला मागणी आहे. याशिवाय ‘राहुल सांस्कृत्यायन : वाेल्गा से गंगा’, ‘भदंत चंद्रमणी महाथेराे’, ‘२८ बुद्ध और उनके अनुयायी’, ‘बाबासाहब और अछुताे का आंदाेलन’, ‘सम्राट अशाेक का इतिहास’ या नव्या ग्रंथांची चर्चा असल्याचे सम्यक प्रकाशनचे संदीप बाैद्ध यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचे समीक्षणात्मक लेखन चर्चेत आहे. ही काळाची गरज हाेती. दीक्षाभूमीवर हे साहित्य उपलब्ध आहे. वाचकांनी आवर्जुन खरेदी करावे. काही प्रशासक महिलांचे आत्मचरित्र प्रेरणादायी ठरेल. - संजय जीवने