लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वंचित, शोषितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकातून समाजातील वंचितांचे प्रश्न मांडण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी केले.डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमीच्या मराठी विभागातर्फे मूकनायक शताब्दी महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी भंते नागार्जुन सुरई ससाई होते. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद भोयर, मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे उपस्थित होते. भंते नागार्जुन सुरई ससाई म्हणाले, मूकनायकातून बाबासाहेबांनी दलितांच्या समस्यांना वाचा फोडली. तत्कालीन प्रश्न, मानवी मूल्यांना स्थान देण्यासाठी मूकनायकने महत्त्वाची कामगिरी बजावली. ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार म्हणाले, नायक हा बोलता असतो. परंतु बाबासाहेबांचा नायक हा मूक होता. समाजाला बोलते करण्यासाठी त्यांनी आपल्या पाक्षिकाला मूकनायक हे नाव दिले. संत तुकारामांचा अभंग ते मूकनायकात टाकायचे. बहिष्कृत भारतात ते ज्ञानेश्वरांच्या ओवी टाकत. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर बाबासाहेब आक्रमक होत गेले. मूकनायकाच्या पहिल्याच अग्रलेखात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळत असून वंचित वर्ग मागे राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द समाजाच्या अंत:करणाला भिडणारा होता. परंतु आजची पत्रकारिता गल्लाभरू आणि बाजारू झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त करून, लोकशाहीचे चारही स्तंभ स्वच्छ राहिले नसल्याची टीका त्यांनी केली. विलास गजघाटे यांनी बाबासाहेब आंबेडकर निर्भीड संपादक असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी केले. आभार प्रा. अमित दुर्योधन यांनी मानले.विविध सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शनमूकनायक शताब्दी महोत्सवाच्या पहिल्या सत्रात प्रा. जावेद पाशा, सुनील खोब्रागडे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. सिद्धार्थ बुटले, दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती : भंते नागार्जुन सुरई ससाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:58 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी केले.
ठळक मुद्दे‘बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन