नागपूर : दक्षिण कोरियामध्ये बुद्धिजम मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ऐतिहासिक धम्मक्रांती सुद्धा कोरियातील लोक आता समजू लागले आहेत. रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेल्या त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीने कोरियन नागरिकांना भुरळ घातली आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांचे साहित्य कोरियन भाषेत भाषांतरित करण्यात येत असल्याची माहिती कोरियन ट्रेडिशनल मेडिसीन असोसिएशनचे अध्यक्ष आणि कोरियन धम्म व मेडिसीन मास्टर डॉ. हांग जिनयू यांनी दिली.
डॉ. हांग जिनयू यांच्या नेतृत्वात दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने दीक्षाभूमीला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. झेन धम्म मास्टर कुलगुरू डॉ. लिची रेन, जियांग हांग, क्यूयंग, पार्क जॉनब्गी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने दीक्षाभूमी स्मारकातील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बुद्ध वंदना घेतली. यावेळी नितीन साळवे, डॉ. संजय रामटेके, अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.