सुमेध वाघमारे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक क्रांतीला उभे करण्यासाठी अनेकांचे हात झटले. या सोहळ्याचा पाया ज्यांनी कष्टाने, निष्ठेने भक्कम केला अशा अनेक भीमसैनिकांपैकी एक आहेत मारोती हिरामण बहादुरे. धम्मदीक्षेच्या सोहळ्यात बाबासाहेबांचे कवच म्हणून ते उभे राहिले. साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी धडपडणारे असे ते सच्चे भीमसैनिक होते.नागपूर जिल्ह्यातील आष्टी गावात एका गरीब कुटुंबात मारोतीचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांना अस्पृश्यतेचा माराही सहन करावा लागला. पावसाळी दिवसात गावाचे रस्ते चिखलाने भरलेले असताना शाळेत जातेवेळी मारोतीचे पाय चिखलाने माखायचे, तेव्हा इतर स्पृश्य सवर्णांच्या मुलाप्रमाणे स्वच्छ पाणी दिले जात नसे, त्यांना रस्त्यातील एखाद्या डबक्यातील घाण पाण्याने आपले पाय धुवावे लागायचे, त्यानंतरच वर्गात प्रवेश दिला जायचा. चातुर्वर्ण्याच्या विषारी अस्पृश्यतेच्या या जखमा माथ्यावर कोरून १९३९ ला ते नागपुरात आले. मॉडेल मिलमध्ये नोकरी धरली. त्यावेळी पं. रेवाराम कवाडे, हि.ल. कोसरे, दशरथ पाटील यांचे दलितोद्धाराचे कार्य जोरात सुरू होते. मारोतीही या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पुढे लोक त्यांना मारोतराव म्हणून ओळखायला लागले. त्यांच्यातील निडरता आणि धाडस पाहून त्यांना समता सैनिक दलाच्या नागपूर शाखेचे उपाध्यक्ष करण्यात आले. १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम मारोतरावांच्या पुढाकाराने चिटणीस पार्क येथे झाला. समता सैनिक दलाचा एक निष्ठावान सेनानी म्हणून मारोतरावांकडे पाहिले जात होते. धम्मदीक्षेसाठी बाबासाहेब मुंबईहून १३ आॅक्टोबरला रात्री १२ वाजता येणार होते. याची माहिती मारोतरावांना मिळताच ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उंटखाना, जोगीनगर या वस्तीतून २००० स्त्री, पुरुषांना नागपूर विमानतळ येथे रात्री ११ वाजता घेऊन गेले होते. जेव्हा बाबासाहेब आनंद टॉकिजजवळील श्याम हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा भेटणाऱ्यांनी गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी रेवाराम कवाडे व बाबू हरिदास आवळे यांनी मारोतरावांच्या देखरेखीखाली एक समता सैनिक दलाचा गट निवडला होता. मारोतराव स्वत: तैनात होते. त्याचवेळी प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर आपल्या २० लोकांसोबत बाबासाहेबांना भेटावयास आले. मारोतरावांनी मोठ्या हिमतीने त्यांना थांबविले. बाबासाहेबांच्या परवानगीनंतरच त्यांना भेटायला जाऊ दिले. माडखोलकर आणि बाबासाहेब यांच्यात होत असलेल्या चर्चेतून वाद उत्पन्न होईल, अशावेळी त्यांनी आपली तयारीही करून ठेवली होती. धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी बाबासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी मारोतरावांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. १६ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे होणाऱ्या दीक्षा सोहळ्याच्या ठिकाणी मारोतरावांनी बाबासाहेबांच्या सुरक्षेचे कार्य केले. ते बाबासाहेबांसोबत चंद्रपूरला गेले होते. समतेच्या प्रवाहाला गती देत बाबासाहेबांची सुरक्षा हे एकच ध्येय मारोतराव यांनी जीवनभर बाळगले होते.‘विदर्भातील दलित चळवळी’चा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) मागोवा आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभागप्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. मारोती बहादुरे यांच्या बद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
बाबासाहेबांचे सुरक्षा कवच ‘मारोतराव’
By admin | Published: October 20, 2015 3:50 AM