न्या. विकास सिरपूरकर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे उमेश चौबे यांचा सत्कार नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उमेश चौबे ऊर्फ बाबूजी यांचे कार्य हे प्रेरणादायी असे आहे. तेव्हा आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ज्येष्ठ समाजसेवी व समितीचे कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त शनिवारी विनोबा विचार केंद्र येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून न्या. विकास सिरपूरकर बोलत होते. यावेळी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव हे अध्यक्षस्थानी होते. तर माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. श्याम मानव म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्थापन केलेल्या संघटनेच्या कामात बाबूजींची नेहमीच साथ राहिली आहे. त्यांचे नेहमीच पाठबळ लाभल्याचेही त्यांनी सांगितले. हरिभाऊ केदार, प्रा. शरद पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हरीश देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणत्याही देवाचा किंवा धर्माच्या विरुद्ध नसून, केवळ बुवाबाजीविरुद्ध आहे. पुरुषोत्तम आवारे यांनी संचालन केले. अॅड. गोविंद भेंडारकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
बाबूजींचे कार्य प्रेरणादायी
By admin | Published: April 23, 2017 3:06 AM