नागपूर : थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनrचा लिलाव करण्याची प्रक्रिया नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केली आहे. मंगळवारी असाच लिलाव होत असताना प्रहारचे आ. बच्चू कडू समर्थकांसह जिल्हा बँकेत धडकले. जर बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला, तर बँक व्यवस्थापनाला धडा शिकवू, शिवाय जमिनी लिलाव मध्ये खरेदी करणाऱ्याचे हातपाय तोडू, असा इशारा आ. कडू यांनी दिला. यानंतर बँकेच्या प्रशासकाकडून लिलाव रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले व शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला.
कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्यासाठी जिल्हा बँकेने नागपूर जिल्ह्यातील सुमारे ३०० शेतकऱ्यांना नोटीस जारी केल्या आहेत. मंगळवारी १९ पेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव बँकेने ठेवला होता. आ. कडू दुपारी समर्थकांसह बँकेत पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव करण्यास कडाडून विरोध करीत लिलाव प्रक्रिया उधळून लावली. यानंतरही लिलाव करण्यात आला तर प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला.
लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी अधिकारी चितरंजन नाईक यांनी दिली. जिल्हा बँक कर्ज वसुलीसाठी शेतजमीन लिलाव करीत असून याकडे लक्ष द्यावे, अशी तक्रार वेणूबाईं पाचपोहर यांचे नातेवाईक सागर वामनराव पाचपोहर यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट किंवा इतर योजनांतून दिलासा देण्याची गरज कडू यांनी व्यक्त केली.
आधी १३० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा
- थोड्या कर्जासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यापेक्षा २००३ मध्ये जिल्हा बँकेत झालेल्या १३० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करा, अशी बच्चू कडू यांनी केली. काँग्रेस नेते आ. सुनील केदार यांचा या घोटाळ्यातला सहभागासंदर्भात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी कडू यांनी केली. या आंदोलनातून कडू केदारांना अडचणीत आणतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.