सुकमा : साेशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ या गाण्याने रात्रीतून स्टार झालेला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सहदेव दिर्डाे हा बालकलावंत दुचाकीच्या अपघातात जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाकेही पडले आहेत.
सुकमाचे एसपी सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार रुग्णालयात पोहोचले आणि त्याची प्रकृती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सहदेवला जगदलपूरला हलविण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजताच्यादरम्यान सहदेव हा त्याच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत दुचाकीने सुकमा जिल्हा मुख्यालयात कुठेतरी जात होता. दरम्यान, जिल्ह्यातील शबरी नगर येथे दुचाकी अनियंत्रितपणे आदळून सहदेव गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने सहदेवला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सहदेव याच्यासोबत दुचाकीवर बसलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली.