नागपूर : रेल्वे प्रवासात हरविलेली वस्तू परत मिळेल याची शाश्वती नसते. परंतु इतवारी रेल्वेस्थानकावर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली प्रवाशाची बॅग परत करून लोहमार्ग पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. ही घटना इतवारी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक सहावर सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
हनुमाननगर येथील रहिवासी योगेश तिवारी (३०) हे इलेक्ट्रिशियन आहेत. ते पत्नी आणि मुलांसह त्यांचे मूळ गाव रिवा येथे गेले होते. परतीचा प्रवास त्यांनी रिवा एक्सप्रेसने केला. इतवारी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर घरी जाण्याच्या घाईत त्यांची एक बॅग प्लॅटफार्म क्रमांक सहावरील सिमेंटच्या बाकावर राहून गेली. घरी गेल्यानंतर बॅग हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान लोहमार्ग पोलीस शिपाई अमित अवतारे, अनिल गायकवाड, करुणा मेश्राम आणि विठ्ठल तडस हे प्लॅटफार्मवर गस्त घालत असताना त्यांना बॅग दिसली. बॅगचा मालक बराच वेळ होऊनही न आल्यामुळे त्यांना शंका आली. बॅगमध्ये स्फोटक वस्तू असू शकते अशी शंका आल्यामुळे त्यांनी श्वान पथकाद्वारे बॅगची तपासणी केली. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख ९०० रुपये असल्याचे आढळले. मोबाईलवरील शेवटच्या कॉलवरून ही बॅग योगेशची असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर काही वेळातच योगेश इतवारी रेल्वेस्थानकावर पोहोचले. सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांनी बॅग योगेशची असल्याची खात्री पटल्यानंतर बॅग त्यांना परत केली. बॅग परत मिळाल्याचे पाहून योगेश तिवारी यांनी इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
............