कामठी : कामठी तालुक्यातील गुमथळा सर्कलमधून भाजपने जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचे तिकीट कापले. निधान यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षात दोन दिवस झालेल्या धुसफूसनंतर अखेर भाजपा पक्षश्रेष्ठी बॅकफूटवर आली.
बुधवारी कढोली येथे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. तीत निधान हेच भाजप समर्थित उमेदवारी असतील, असे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी जाहीर केले. निधान यांचे तिकीट कुणी कापले, हे गुलदस्त्यात असले तरी भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी बाजी मारली, हे निश्चित!
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुमथळा सर्कलमध्ये भाजपने योगेश डाफ यांना उमेदवारी जाहीर केली होती. डाफ यांना उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत पक्षाचा ‘बी’ फॉर्म मिळाला नाही. शेवटी त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. डाफ यांच्यासोबतच अनिल निधान आणि कैलास महल्ले यांनीही दंड थोपटत भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्याही अर्जाला ‘बी’ फाॅर्म नसल्याने मंगळवारी छाननीअंती तिघांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले. कामठी तालुक्यातील भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर येत असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार बुधवारी कढोली येथे पक्षनेत्यांची बैठक झाली. तीत प्रदेश भाजपा महासचिव चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, श्रीकांत देशपांडे, अजय बोढारे, तालुका भाजपा अध्यक्ष किशोर बेले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत, विशाल चामट, भाजपाच्या वतीने अर्ज दाखल करणारे तिन्ही उमेदवार उपस्थित होते. तीत पक्षांतर्गत बंडाळीचा फटका पोटनिवडणुकीत बसू शकतो का, यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. शेवटी कैलास महल्ले आणि योगेश डाफ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे जाहीर केले. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गजभिये यांनी दिली.
निदान निघाले पण ‘कमळ’ गोठले!
निधान यांनी बंडखोरी केल्यानंतर यावर ‘निदान’ काढण्यासाठी भाजपाच्या राज्यपातळीवर नेत्यांना पुढाकार घ्यावा लागला. पण पक्षांतर्गत कुरघोडी यामुळे भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या कामठी मतदार संघातील गुमथळा सर्कलमध्ये जि.प. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘कमळ’ चिन्ह गोठले, हे विशेष.