लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या कृषी विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने संपूर्ण जिल्ह्याच्याच कारभाराची ‘माती’ झाल्याचे चित्र आहे़ सहा पंचायत समित्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्यांची नऊ पदे रिक्त असल्याची आकडेवारी आहे़शासनाने ही पदे मागील काही वर्षांपासून भरली नाही़ परिणामी, जिल्हा परिषदेसह स्थानिक पंचायत समित्यांचा कृषी विभाग कसेतरी दिवस काढत आहे़ याचा फटका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थेट लाभावर पडला आहे़ योजनांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी थांबली आहे़ खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे़ मृग नक्षत्र हे पेरणीचे नक्षत्र आहे़ त्यापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते, पेरणीपूर्व साहित्य अनुदान तत्त्वावर देण्यात येते़ अधिकारीच नसल्याने हे साहित्य कुणामार्फत वाटावे, हा प्रश्न आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचीही हीच अवस्था आहे़ येथे सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे़ आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़रिक्त पदांचा तपशील बघितल्यास, रामटेक पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी, कळमेश्वरमध्ये कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, उमरेड पंचायत समितीत कृषी अधिकारी, कुही येथे विस्तार अधिकारी आणि भिवापूर पंचायतमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी तसेच कामठीमध्ये कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ याशिवाय, कामठीमध्ये मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ त्याचबरोबर जि.प.च्या मुख्यालयातील कृषी विभागात मोहीम अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) एक पद रिक्त आहे. विशेष घटक योजना अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. कनिष्ठ सहा. चे दोन पद रिक्त आहे. वरिष्ठ सहा. लेखाचे एक पद रिक्त आहे. जि.प.चे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांचा अपघात झाल्याने ते सुटीवर आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्तपदामुळे कृषीच्या योजना राबविण्यावर परिणाम होत आहे.ही शेतकऱ्यांप्रती उदासीनताच आहेहंगाम तोंडावर आहे. विभागात अधिकारी नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़ हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहतील. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. अशात येथील शेतकरी हंगामाच्या तोंडावर उपेक्षित राहत असतील तर हे दुर्दैव आहे.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.