लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये व्हीएनआयटीची (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) गणना होते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्था असूनदेखील विभागातील बहुतांश महाविद्यालयांप्रमाणे व्हीएनआयटीमध्येदेखील प्राध्यापकांच्या जागांचा अनुशेष कायम आहे. सद्यस्थितीत संस्थेमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे २८ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत संस्थेचे नॅशनल रॅकिंग कसे सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत व्हीएनआयटीकडे विचारणा केली होती. व्हीएनआयटीत प्राध्यापकांच्या किती मंजूर जागा आहेत, यापैकी प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, गेल्या वर्षांत व्हीएनआयटीतील किती विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार व्हीएनआयटीमध्ये सद्यस्थितीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक मिळून एकूण ३३५ मंजूर पदे आहेत. यापैकी प्रत्यक्षात केवळ २३९ जागाच भरल्या आहेत. तब्बल ९६ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २८.६६ टक्के इतकी आहे.
द्वितीय, तृतीय श्रेणीत कमी कर्मचारीशिक्षकांपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा तर आणखी जास्त प्रमाणात रिक्त आहेत. संस्थेत शिक्षकेतर अधिकाऱ्यांच्या ३३ जागा आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजेच १४ जागा रिक्त आहेत. तांत्रिक श्रेणीतील १०१ पैकी ६८ जागा (६७.३३ टक्के) रिक्त आहेत. अशा स्थितीत तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.